नागपूर, 23 ऑगस्ट : प्रेमप्रकरणातून अनेक खून झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पण पतीच्या प्रेम प्रकरणाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेयसीच्या प्रेमात वेडा झालेल्या पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अश्विनी प्रवीण घुग्गुसकर असं आत्महत्या केलेल्या पत्नीचं नाव आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांत या प्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे तर पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
कोरोनाही मोडू शकला नाही दगडूशेठ बाप्पाची 34 वर्षांची परंपरा, असा झाला कार्यक्रम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016मध्ये अश्विनीचा प्रवीण घुग्गुसकर याच्याशी विवाह झाला. राजा-राणीचा सुखाचा संसार सुरू असताना त्यांना एक 3 वर्षाचा मुलगाही आहे. पण सुरुवातीचे काही दिवस गेले आणि त्यानंतर अश्विनीचा छळ सुरू झाला. प्रवीणकडून तिला रोज मारहाण करण्यात येत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं.
'माझं एका युवतीवर प्रेम आहे, तिच्यासोबतच मला लग्न करायचं आहे. त्यामुळे तू मुलाला घेऊन निघून जा' अशी धमकी प्रवीण वारंवार देत होता. यामुळे तो अश्विनीला रोज मारायचा. तिचा मानसिक छळ करायचा. सगळ्यात धक्कादायक म्हणजे यामध्ये पतीच नाही तर अश्विनीचे सासरे आणि सासूही तिला बेदम मारहाण करायची.
मुंबईत आज दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, विसर्जनाआधी वाचा 'या' नव्या अटी
काही दिवसांनी प्रवीणने थेट प्रेयसीला घरी आणणं सुरू केलं. अश्विनी समोर असतानाही ते दोघे बेडरूममध्ये एकत्र राहायचे. त्यात पतीची प्रेयसीदेखील तिला धमकी देत होती. त्यामुळे या सगळ्याला कंटाळून अखेर तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिने विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.