पुसद 10 मार्च : देशात ‘कोरोना’चे रुग्ण वाढत असल्याने देशभर चिंता वाढली आहे. विदेशातून येणाऱ्यांसोबत कोरोनाने भारतात प्रवेश केला आहे. याचा सर्वच क्षेत्रांना जोरदार फटका बसला आहे. सरकारच्या जाहीरातींमुळे आता तर ग्रामीण भागापर्यंत याचं लोण पसरलं आहे. एकत्र जमू नका. गर्दी टाळा असं आवाहन सरकारने केलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या जत्रा आणि यात्रांवरही संकटं आलंय. प्रशासनाने या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर लग्न समारंभांवरही बंधणं येण्याची शक्यता व्यक्त केलीय जातेय. याचाच धसका एका नवरदेवाने घेतलाय. साखरपुड्यासाठी मुलाकडी मंडळी मुलीच्या घरी गेली तिथे कोरोनाचा विषय निघाला आणि आता लग्नच करून टाकू असा आग्रह नवरेदेवाने घेतला आणि हा लग्न सोहळा काही तासांमध्ये पार पडला. यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद इथं ही घडलेला हा विवाह चर्चेचा विषय झाला आहे. वाशिम जिल्ह्यातल्या किनखेडच्या शुभम देशमुख आणि पुसदची दिपाली कदम यांचा विवाह ठरला होता. मे महिन्यात विवाहाची तारीख ठरली होती. त्याआधी रविवारी 8 मार्चला पुसद इथं साखरपुडा करण्याचं ठरलं होतं. ठरलेल्या कार्यक्रमानुसार मुलाकडची मोजकी मंडळी साखरपुड्यासाठी पुसदला आली. कार्यक्रमासाठी सर्व पाहुणे मंडळी घरी जमल्यावर गप्पांचा फड रंगला. हे वाचा - पुण्यात ‘कोरोना’चा प्रवेश, पालिकाने काही तासांमध्ये उभारलं 200 खाटांचं रुग्णालय त्यावेळी कोरोनाचा विषय निघाला. गर्दी टाळण्याच्या सूचना सरकार देत आहे. त्यामुळे लग्नाचं कसं होणार? बंदी घातली तर काय करणार? लोक लग्नाला येतील का? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. मुलाच्या लग्नाचं स्वप्न आयुष्यभर पाहिलं तो लग्न सोहळाच झाला नाही तर काय करणार? या प्रश्नाने पालकांच्या मनात घर केलं. हे वाचा - मानलं पुण्यातल्या रिक्षा चालकाला, 16 लाखांच्या दागिन्यांची बॅग केली परत तर लग्न लांबणीवर तर पडणार नाही ना? या भीतीने नवरदेवाला ग्रासलं होतं. शुभमने दिपालीशी चर्चा केली आणि दोघांनी आपल्या पालकांसोबत बैठक घेतली. पाहुणे आणि सर्व कुटुंबीयांनी त्याच दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तीन तासात तयारी होऊन दिपाली आणि शुभम विवाहबंधनात अडकले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.