मुंबई, 21 डिसेंबर : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या ग्रामंपचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. गावागावामध्ये नवे सरपंच निवडून आले आहे. पण यंदा ही सरपंचाची निवड खास राहिली आहे. कारण, कुठे सूनेनं सासूला हरवलं आहे तर कुठे आईने मुलीला हरवलं आहे. तर कुठे अगदी भाजी विक्रेता सुद्धा सरपंच झाला आहे. त्यामुळे या नव्या सरपंचाची जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रात 7751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालाचा धुरळा उडाला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत बोधरा-देवाळामध्ये एकाच कुटुंबातील सासू आणि सून सरपंच पदाकरिता निवडणूक रिंगणात आमने -सामने होते. त्यामुळे निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर मतमोजणीअंती सुनेनं या निवडणुकीत बाजी मारली आहे. सासूचा पराभव करून सून सरपंच झाली आहे. सून सरपंचपदावर निवडून आल्याने गावामध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला. आई आणि मुलीच्या निवडणुकीत आईने मारली बाजी गुहागरमधील आरे ग्रामपंचायत मधील आई विरुद्ध मुलगी मध्ये झालेली लढत लक्षणीय ठरली आहे. या निवडणुकीत आईने मुलीवर मात करत विजय प्राप्त केला आहे. आईला सुवर्णा भोसले (वय 70) यांनी ठाकरे गटाकडून सदस्य पदासाठी निवडणूक लढवत एकूण 282 मते मिळवली तर त्यांची पोटची लेक प्राजक्ता देवकर हिला 232 मतं मिळाली. या चुरसीच्या लढतीत आईने विजय मिळवला असल्यामुळे अखेर बाप बाप होता है ऐवजी आता आई देखील काय करू शकते याचे दर्शन या लढती मधून झाले आहे. (Gram Panchayat Election Result : थेट माजी सरपंचांना हरवत मनसेची कोल्हापुरातल्या ग्रामपंचायतीत एन्ट्री) बँड वाजवत बँडवाला बनला सरपंच, पॅनलही केलं विजयी तर, कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा वरेवाडी गावात एक भाजी विक्रेता थेट सरपंचपदी निवडून आला आहे. आनंदा रामचंद्र भोसले असं सरपंचपदी निवडून आलेल्या उमेदवाराचं नाव आहे. एरंडोल तालुक्यातील अंतुर्ली खुर्द या ग्रामपंचायतीवर कुठल्याही पक्षाचा पाठिंबा न घेता चक्क एक बँडवाला सरपंच म्हणून निवडून आला आहे. फक्त स्वतःच नाही तर या बँडवाल्याने आपले संपूर्ण पॅनलही विजयी केले आहे. कांतीलाल गणसिंग सोनवणे असं या बँडवाल्याचं नाव आहे. मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाला लागला. यामध्ये कांतीलाल सोनवणे हे सर्वांना धक्का देत सरपंचपदाच्या निवडणुकीत विजीयी झाले आहेत, एवढेच नव्हे तर त्यांनी आपलं अख्ख पॅनलही विजयी केलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात या ग्रामपंचयत निवडणुकीची चांगलीच चर्चा रंगली असून, कांतीलाल यांचं कौतुक होत आहे. भाजी विक्रेत्याची झाली सरपंचपदी निवड! कोल्हापूर जिल्ह्यात एका निकालानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा वरेवाडी गावात एक भाजी विक्रेता थेट सरपंचपदी निवडून आला आहे. आनंदा रामचंद्र भोसले असं सरपंचपदी निवडून आलेल्या उमेदवाराचं नाव आहे. आनंदा हे शिवसेना ठाकरे गटाकडून सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी उभारले होते. त्यांच्या विरोधात जन सुराज्य शक्तीचे विश्वास भोसले रिंगणात होते. या निवडणुकीत आनंदा यांना 391 तर विश्वास यांना 330 मतं मिळाली. आनंदा यांनी कोरे गटाच्या उमेदवाराचा 60 मतांनी पराभव केला. (बुलढाण्यात एकाच सरपंचावर तीन पक्षाचा दावा; तिघांनी सत्कार केल्याने गावकरीही हैराण) आनंदा हे पहिल्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आदर्श समोर ठेवणारे कट्टर शिवसैनिक आहेत. विजय मिळाल्याचं समजताच त्यांनी बाळासाहेबांचा फोटो उंचावून विजयाचा जल्लोष साजरा केला. आंनदा हे सरपंच झाल्याची गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे वरेवाडीसह बांबवडे पंचक्रोशीत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बायको झाली सरपंच अन् 3 वर्षांनंतर काढणार दाढी पंढरपूर तालुक्यातील आजोती ग्रामपंचायत सरपंच पदासह सर्व गट राष्ट्रवादीचा निवडून येण्यासाठी अमरजीत पवार हे आग्रही होते. त्यानुसार आरती अभिजित पवार हे विजयी झाले. या विजयानंतर अमरजित पवार यांच्या केसाची व दाढीची चर्चा रंगली. गेल्या तीन वर्षापासून सरपंच पद राष्ट्रवादीचा झाल्याशिवाय आपण केस आणि दाढी काढणार नाही. असा पण, पवार यांनी केला होता. आणि अखेर अमरजीत पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जनतेमधून सरपंच झाल्यावर त्यांनी हा आपला पण, तिरुपती बालाजी येथे जाऊन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी मतदारांचे आभार मानत पुष्पा स्टाईलने आपल्या केसावरून आणि दाढीवरून हात फिरवत मतदारांना अभिवादन करत आभार मानले. शिक्षण सोडलं अन् तिने गाव जिंकलं; फॉरेन रिटर्न यशोधरा झाली वड्डीची सरपंच जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतलेली फॉरेन रिटर्न तरुणी महाराष्ट्रात येऊन सरपंच बनली आहे. यशोधरा महेंद्रसिंग शिंदे ही सांगली जिल्ह्यातील ‘वड्डी’ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी निवडून आली आहे. या निवडणुकीत शिंदे यांच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाला असून सर्व जागेवर उमेदवार निवडून आले आहेत. यातफॉरेन रिटर्न उच्चशिक्षित उमेदवार यशोधरा राजे सरपंचपदी निवडून आल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील सुमारे पाच हजार लोकवस्तीचं वड्डी छोटंसं गाव आहे. मिरज शहरालगत असणारं हे गाव आहे. या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत विकासाचा मुद्दा उपस्थित करत जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतलेली तरुणी यशोधरा महेंद्रसिंग शिंदे ही निवडणुकीत सरपंचपदाची उमेदवार झाली. पुतण्याने दिला काकाला धोबीपछाड, एक हाती मिळवली सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर या काका-पुतण्यातील सत्ता संघर्ष ग्रामपंचायत निवडणुकीत देखील पहावयास मिळाला आहे. नवगन राजुरी जिल्हा परिषद सर्कल मधील नवगण राजुरी या होमपीचवर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचा धुव्वा उडवत संदीप क्षीरसागर यांनी काकाला धोबीपछाड दिला. या सर्कलमधील चार ग्रामपंचायत संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत. धन जनशक्ती विरुद्ध जनशक्तीमध्ये जनशक्तीचा विजय झाला. तसेच मुंबईत राहून ग्रामपंचायत निवडणुका जिंकता येत नाहीत त्याला जनतेत उतरावं लागते, असं म्हणत संदीप क्षीरसागर यांनी काकांना टोला लगावला. गेल्या पाच, सात वर्षांपासून संदिप क्षीरसागर आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यातील सत्ता संघर्ष सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आणि अभुवला आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार क्षीरसागरांनी नवगण राजुरीच्या ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला होता. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा यावेळी त्यांनी केली कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या सासू झाल्या सरपंच! अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यामध्ये लोकप्रिय किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासू विजयी झाल्या आहे. संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतून विखे पाटील समर्थक असलेल्या इंदोरीकर महाराज यांच्या सासू शशिकला शिवाजी पवार अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. मतमोजणीअंती शशिकला पवार यांचा विजय झाला. भाजप पुरस्कृत पँनल असल्याची विजयी सदस्यपदाचे उमेदवार भाऊसाहेब आहेर यांनी अशी माहिती दिली आहे. इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई सरपंच झाल्या आहेत. बुलढाण्यात एकाच सरपंचावर तीन पक्षाचा दावा बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या लोखंडा येथे दुर्गा श्रीकृष्ण ठाकरे या सरपंचपदी थेट जनतेतून निवडून गेल्या आहेत. मात्र, या नवनियुक्त महिला सरपंचांचा काँग्रेस, भाजप त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून सत्कार करण्यात आला आहे. त्यामुळे निवडून आलेल्या महिला सरपंच कोणत्या पक्षाच्या? हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे निवडून आलेल्या एका महिला सरपंचावर तीन पक्षांकडून दावा करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे बुलढाणा जिल्ह्यातील अनेकांचे डोके चक्रावले आहे. कॉलेजची GS व्हायच्या वयात झाली गावची सरपंच रायगड जिल्ह्यातील एका तरुणीला राज्यातील सर्वात कमी वयाची सरपंच म्हणून बहुमान मिळाला आहे. याची जोरदार चर्चा रंगली आहे. नुहा जावेद ढांगु असे या तरूणीचे नाव आहे. ती रायगडमधील वाळवटी ग्रामपंचायतीमधून निवडून आले आहे. यानिमित्ताने ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत एक सकारात्मक बदल बघायला मिळाला. रायगडमधील वाळवटी ग्रामपंचायतीत 22 वर्षांची मुलगी सरपंच झाली आहे. नुहा जावेद ढांगु नवनिर्वाचित सरपंच असून ती 22 वर्षांची आहे. श्रीवर्धन तालुक्यातील सगळ्यात लहान सरपंच होण्याचा मान तिला मिळाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे गटांची यांनी एकत्र निवडणुक लढवली. विजयी ठरलेल्या नुहाने आपल्या मतदारांना नाराज करणार नाही आणि त्यांच्यासाठी कम करणार असा निर्धार व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.