सिंधुदुर्ग, 3 डिसेंबर : ठाकरे गटाचे कोकणातील आणखी एक आमदार अँटी करप्शन ब्युरोच्या रडावर आला आहे. आमदार वैभव नाईक यांना पुन्हा एकदा अँटी करप्शन ब्युरोकडून नोटीस मिळाली आहे. सोमवारी 5 डिसेंबरला रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात हजर राहण्यास या नोटीसीत सांगण्यात आले आहे. वैभव नाईक यांच्यानंतर राजन साळवी यांना देखील अँटी करप्शनची नोटीस आली आहे. या नोटिसीमध्ये मालमत्तेसंदर्भात उल्लेख केला आहे.
वैभव नाईक यांना नोटीस
याआधी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने वैभव नाईक यांना नोटीस पाठवली होती. त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. वैभव नाईक यांनी यापूर्वीच अँटी करप्शन कार्यालय रत्नागिरीला मेल करत यापूर्वीच वेळ मागून घेतला आहे. वैभव नाईक यांनी त्यानंतर कुडाळ इथल्या अँटी करप्शन कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर निलेश राणे यांनी काढलेल्या संविधान बचाव रॅलीमध्ये प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे नेते देखील सहभागी झाले होते. यावेळी वैभव नाईक यांच्यावर सरकार दबाव आणू पाहत आहे, असा आरोप देखील ठाकरे गटाकडून करण्यात आला होता.
वाचा - 'संजय राऊतांनी शिवसेनेचं वाटोळ केलं; उद्धव ठाकरेंचाही विश्वासघात', शिंदे गटाचा पुन्हा हल्लाबोल
2002 ते 2022 कालावधीतील उत्पन्न, खर्च व मालमत्ता या बाबतचा तपशील देण्याचे वैभव नाईक यांना एसीबीने आदेश दिले आहेत. आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेबाबत केलेल्या तक्रारीनुसार चौकशी करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने आपल्या मालमत्तेच्या कागदपत्रांसहित व जबाब नोंदणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची नोटीस दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी विभागामार्फत ही नोटीस जारी करण्यात आली आहे.
नोटिशीवरून विविध चर्चांना उधाण
ठाकरे गटातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा - राजापूर - साखरपा या विधानसभा मतदारसंघातील राजन साळवी हे आमदार आहेत. मागच्या काही दिवसांपासून ते शिंदे गटात जाणार, अशी चर्चा देखील सुरू होती. पण राजन साळवी यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. शिवाय त्यांच्या वरती दबाव टाकला जात आहे. पण राजन साळवी कुठेही जाणार नाहीत. ते मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या वतीनं त्यांनी यापूर्वीच दिली होती. पण सध्या अँटी करप्शन ब्युरोची आलेली नोटीस आणि मागच्या काही राजकीय घडामोडी, चर्चा यामुळे मात्र सध्या आलेल्या नोटिशीवरून विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uddhav tahckeray