गडचिरोली, 25 सप्टेंबर: युजीसी अंतर्गत येणाऱ्या विद्यापीठांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाही. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत परीक्षा रद्द करता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं. त्यानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी सुरू आहे. राज्यातील विद्यापीठांनी परीक्षेचं वेळापत्रकही जाहीर केलं आहे. मात्र, ऐन परीक्षेच्या तोंडावर गोंडवाना विद्यापीठात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारलं आहे.
हेही वाचा...वाधवान प्रकरणावर पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी अखेर मौन सोडलं
राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठातील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, आश्वासित प्रगती योजना, पाच दिवसांचा आठवडा अशा दहा प्रमुख मागण्या लागू करण्याच्या मागणीसाठी गोंडवाना विद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यापीठाचे कामकाज पूर्णता ठप्प झालं आहे.
राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. परंतु राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांना अद्यापही सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यातील महाविद्यालयीन व अकृषी विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. म्हणूनच विद्यापीठ अधिकारी-कर्मचारी संघटनेने लेखणी बंदचे हत्यार उपसलं आहे. 30 सप्टेंबरपर्यंत हे आंदोलन चालणार असून यानंतरही शासनाने लक्ष न दिल्यास एक ऑक्टोंबरपासून आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यापीठ अधिकारी- कर्मचारी संघटनेनं दिला आहे, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठातील आंदोलनकर्ते सतिश पडोळे यांनी दिली आहे.
पुणे विद्यापीठ पदवी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
दुसरीकडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा एमसीक्यू पद्धतीने 1 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत घेऊन, निकाल 10 नोव्हेंबरपूर्वी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून परीक्षेचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, मौखिक किंवा प्रकल्पाच्या परीक्षा 30 सप्टेंबरपूर्वी घेण्यात येणार आहे.
हेही वाचा...गुडघ्यावर बसून गर्लफ्रेंडला करत होता प्रपोज, अचानक समोरून वेगानं आली सायकल
अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी नियमित, पुनःपरीक्षार्थी , बॅकलॉग विषयांच्या परीक्षा 13 मार्च 2020 पर्यत पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर घेण्यात याव्यात. तसेच अंतिम पूर्व वर्षाच्या पुनःपरीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर घेण्याच्या सूचना केल्या आहेत. ऑनलाइन परीक्षेची माहिती विद्यार्थ्यांना होण्यासाठी सराव परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gadchiroli, Pune university