उल्हासनगर, 27 ऑक्टोबर : सध्या शिवसेना आणि भाजपात विस्तव जात नसल्याचं चित्र आहे. मात्र उल्हासनगर महापालिकेत मात्र शिवसेनेच्या मदतीने भाजप नगरसेवकाने स्थायी समिती सभापतीपदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपाच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे.
या राजकारणामुळे उल्हासनगर महापालिकेत गुरुवारी होणारी स्थायी समिती सभापतीची निवडणूक चर्चेत आली आहे. भाजप नगरसेवक विजय पाटील यांनी स्थायी समिती सभापतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून शिवसेनेची मदत घेतली आहे. भाजपकडे 9 तर महाविकास आघाडीकडे 7 स्थायी समिती सदस्य संख्या आहे.
त्यामुळे सभापती हा भाजपचा होणार हे स्पष्ट होते. मात्र आता भाजप नगरसेवकाने शिवसेनेची मदत घेतल्याने आणि भाजपच्या आणखी एक स्थायी समिती सदस्याने राजीनामा दिल्याची माहिती समोर येत असल्याने महाविकास आघाडी भाजपची सभापतीची गणितं बिघडवणार असे चित्र निर्माण झाले आहे.
हेही वाचा - सासरे पक्ष सोडून गेल्यानंतर सूनबाईंची बैठकीला दांडी, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
भाजप नगरसेवकाने मदत मागितल्याने आम्ही मदत केली, मात्र हे राजकारण आम्ही भाजपकडून शिकलो आहे, असं शिवसेनेने स्पष्ट केलं आहे. भाजपने राजकुमार जाग्याशी आणि जया माखिजा यांचे अर्ज भरले आहेत. निवडणुकीपूर्वी पाटील यांना व्हीप बजावणार असून उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा भाजपने दिला आहे.