मंदीमुळे लोक 'भूक-भूक' करत रस्त्यावर येतील,त्यांनाही गोळ्या घालणार काय? उद्धव ठाकरेंचा सवाल

मंदीमुळे लोक 'भूक-भूक' करत रस्त्यावर येतील,त्यांनाही गोळ्या घालणार काय? उद्धव ठाकरेंचा सवाल

देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक स्थितीत असल्याचा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे. मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्थेचा विकास मंदावला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

  • Share this:

मुंबई, 4 सप्टेंबर : देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक स्थितीत असल्याचा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे. मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्थेचा विकास मंदावला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मनमोहन सिंग यांनी केलेल्या विधानाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही समर्थन दर्शवलं आहे. ''आर्थिक मंदीवर भक्तांनी कितीही उलटे सुलटे सांगितले तरी सत्याचा कोंबडा आरवलाय व मौनीबाबा डॉ. मनमोहन सिंग यांनी सौम्य शब्दांत सांगितलेल्या सत्याचाही स्फोट झालाच आहे. अर्थव्यवस्थेला बूच लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अर्थव्यवस्थेचा संबंध पक्षनिधी, निवडणुका जिंकणे, घोडाबाजार वगैरेपुरताच उरला आहे. त्यातून 'देशाची व्यवस्था' नष्ट होत आहे. आर्थिक मंदीचे राजकारण करू नये व तज्ज्ञांच्या मदतीने देश सावरावा असे आवाहन मनमोहन सिंग या शहाण्या माणसाने केले आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच राष्ट्राचे हित आहे'', अशा शब्दांत आपलं मत उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये मांडलं आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

- देशाच्या अर्थव्यवस्थेचे विघ्न काही दूर होताना दिसत नाही. उलट चिंतेत भर टाकणाऱया बातम्या येत आहेत. त्यात मनमोहन सिंग यांनी मंदीसंदर्भात भाष्य केले व भविष्यातील कठीण काळाची जाणीव करून दिली. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. अर्थव्यवस्था घसरली आहे व भविष्यात कोसळणार आहे असे जेव्हा मनमोहन सिंग सांगतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो.

(वाचा : नव्या Traffic Rules चा दणका : 15000 ची स्कूटर आणि 23000 चा दंड)

- पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांच्या कर्तबगारीवर आमचा विश्वास आहे. त्यांनी देशाला शिस्त लावली आहे. मोदी जेव्हा पाकिस्तानला इशारे देतात, भविष्यात पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानला जोडण्याचे आश्वासन देतात तेव्हा देश त्यांच्यावर डोळे मिटून भरवसा ठेवतो. मोदी यांनी पाकिस्तानला धडा शिकविण्याचे ठरवले आहे. मोदी ते करून दाखवतील याबाबत आमच्या मनात शंका नाही, पण अर्थव्यवस्था व लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.

- अर्थव्यवस्थेतील खाचखळग्यांबाबत मनमोहन सिंग बोलत आहेत. देशात आर्थिक मंदीमुळे जी भयंकर स्थिती उद्भवली आहे, त्याचे भाकीत मनमोहन सिंग यांनी चार वर्षांपूर्वीच केले होते. आज जे घडत आहे ते घडणार असे ‘मि. क्लीन’ मनमोहन यांचे तळमळीचे सांगणे होते. मनमोहन सिंग यांची तेव्हा यथेच्छ टिंगल-टिवाळी करण्यात आली. ‘‘मनमोहन सिंग हे रेनकोट घालून शॉवरखाली आंघोळ करतात’’ असे एक विधान पंतप्रधान मोदी यांनी मागे केले होते. थोडक्यात, मनमोहन सिंग यांना अर्थशास्त्रातले काहीच कळत नाही असे नव्या राज्यकर्त्यांचे म्हणणे पडले

(वाचा  : आधार अपडेट करायचंय? 'अशी' आहे सोपी पद्धत)

- पण त्यांना अर्थशास्त्र्ा व राष्ट्राचे अर्थकारण कळते हे सांगायला आम्हाला संकोच वाटत नाही

- मनमोहन यांनी आता नुसते तोंड उघडले नाही, तर घणाघात केला आहे. मोदी सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा फटका आज देशाला बसत आहे. नोटाबंदी आणि जीएसटीसारखे निर्णय देशातील आर्थिक मंदीसाठी कारणीभूत ठरल्याचे मनमोहन सांगत आहेत. देशाचा विकास दर घसरला आहे, उत्पादन क्षेत्रातील वाढ घसरली आहे व लाखो लोकांवर नोकऱया गमावण्याची वेळ आली आहे. मात्र हे चित्र सरकारला भयावह वाटू नये ही स्थिती धक्कादायक आहे.

(वाचा : काँग्रेसच्या चाणक्यला अटक; डी.के.शिवकुमार ईडीच्या जाळ्यात!)

- देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन इतकी बनवायचे मोदी यांचे स्वप्न आहे, पण चीनची अर्थव्यवस्था 13 ट्रिलियन इतकी आहे व अमेरिकेची अर्थव्यवस्था 15 ट्रिलियनच्या पुढे आहे व त्या तुलनेत हिंदुस्थानची अर्थव्यवस्था 2.5 ट्रिलियनवर अडकली. त्यात आता मंदीचा मार बसत आहे.

- आता ऑगस्ट महिन्यात जीएसटीचे कलेक्शन एक लाख कोटींपेक्षा कमी झाले आहे. हे कसले लक्षण समजायचे? ‘‘निर्णय चुकले व निर्णय चुकत आहेत, विचार करा’’ असे सांगणाऱयांना मूर्ख ठरवण्यात आले.

- मोदी यांनी अलीकडेच सर्व मंत्र्यांना तंबी दिली की, उगाच मोठय़ा घोषणा करू नका, ज्या घोषणा पूर्ण करता येणार नाहीत त्या करू नका. याचा अर्थ घोषणाबाजी बंद करणे हाच आहे. मंदी आहे व घोषणा करून लोकांना आशेला लावू नका, पण अशा मोठय़ा घोषणांचे फटाके फोडायला सुरुवात केली कोणी? अर्थात 370 कलम हटवून सरकारने धाडसी पाऊल टाकले व देश त्याबद्दल आनंदी आहे. मात्र कश्मीर आणि आर्थिक मंदी हे दोन भिन्न विषय आहेत. कश्मीरात विद्रोही रस्त्यांवर उतरले तर त्यांना बंदुकांच्या जोरावर मागे रेटता येईल, पण आर्थिक मंदीवर बंदुका कशा रोखणार?

- मंदीमुळे बेरोजगारी उसळेल व लोक ‘भूक भूक’ करीत रस्त्यावर येतील तेव्हा त्यांनाही गोळय़ा घालणार काय?

- देशाची आर्थिक नाडी हाती ठेवून राजकीय व्यवस्था हवी तशी हाकणे हे धोकादायक आहे. उद्योग, व्यापार करणाऱयांच्या मानेवर सुरी ठेवून राजकीय पक्षांना तात्पुरता फायदा होऊ शकेल, पण देश मात्र कोसळत आहे.

SPECIAL REPORT : वाहन उत्पादक क्षेत्रात का आली मंदी, काय आहे कारण?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2019 06:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading