मुंबई, 26 जानेवारी : शिवसेनेत झालेल्या भूकंपानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात येणार आहेत. 26 जानेवारीला उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये येणार आहेत, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे.
उद्धव ठाकरे प्रजासत्ताक दिनी ठाण्यातील तलाव पाळी परिसरात वैद्यकीय शिबीराला भेट देणार आहेत, यानंतर उद्धव ठाकरे आनंद आश्रमात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनाही श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याचा कार्यक्रम
दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे महाआरोग्य शिबिरामध्ये येतील. दुपारी 12.50 मिनिटांनी ते टेंभी नाक्यावरच्या आनंदमठाला भेट देणार आहेत. दुपारी 1.15 वाजता उद्धव ठाकरे चरई जैन मंदिरात जाणार आहेत. दुपारी 1.45 ते 2.30 पर्यंतची वेळ राखून ठेवण्यात आली आहे. यानंतर दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना होतील.
याआधी नवरात्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनाला आल्या होत्या, त्यावेळीही शिवसेना ठाकरे गटाकडून ठाण्यात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत राजकीय भूकंप झाला, याचं केंद्रबिंदू ठाणेच ठरलं. ठाणे जिल्ह्यातले शिवसेनेचे जवळपास सगळेच पदाधिकारी आणि नेते शिंदेंसोबत गेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचं मुख्य कार्यालयही ठाण्यामध्येच आहे. ठाणे आणि शिवसेनेचं आतापर्यंतचं नातं वेगळं होतं. मुंबईआधीही ठाण्यामध्येच शिवसेनेचा पहिला महापौर झाला होता, यानंतर ठाणे महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Uddhav Thackeray