मुंबई, 27 जुलै : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा पार्ट आज प्रसिद्ध करण्यात आला. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील फुटीसह राष्ट्रवादीत अजित पवार यांनी केलेल्या बंडाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यात त्यांना अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर विचारले होते. शरद पवार यांनी रिटायर व्हायला हवं असं अजित पवार म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, हे अत्यंत वाईट विधान होतं. असं बोलणं मला पटलेलं नाही. तुम्हाला सगळं काही दिलं त्यांना असं बोलणं हे मला पटलं नाही. उद्धव ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांनी रिटायर व्हावं असं बोलणं हे अत्यंत वाईट असं मत होतं. कारण शेवटी ज्यांच्याकडून आपण सर्वकाही घेतो त्यांच्याबद्दल असे उद्गार काढणं हे आपल्या संस्कृतीला शोभा देणारं नाही. नेहमी आपण वडीलधाऱ्यांचा मान, आदर, सन्मान ठेवतो. आणि तो ठेवलाच पाहिजे. वय झालं म्हणजे काय? मग आशीर्वाद कोणाकडून घ्यायचे? हे त्यांचं वक्तव्य मला आवडलं नाही. शिवसेना, हिंदुत्व, सत्ता, राष्ट्रवादी अन् बरंच काही; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतले 10 मुद्दे तुमचं पटत नसेल तर जाहीर सांगा की तुमचं का पटत नाही. या वयातसुद्धा ज्यांनी तुम्हाला सगळं काही दिलं त्यांना तुम्ही आता या पद्धतीने बोलणार हे मला पटलेलं नाही. केवळ अजित पवारच नाही, तर ज्याला कोणाला त्याच्या स्वार्थासाठी जायचं असेल तर स्वार्थासाठी जातोय हे खरं बोलून जावं, कदाचित लोकं स्वीकारतील. पण चार-चार, पाच-पाच वेळा सगळं मिळाल्यानंतर, सगळं जे चांगल्यात चांगलं देता येणं शक्य होतं ते दिल्यानंतरसुद्धा अन्याय झाला हो… म्हणून टाहो फोडून जाणं हे बरोबर नाही. मग त्यात आमच्यातलेसुद्धा गद्दार असतील आणि सगळ्याच पक्षातले गद्दार असतील असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. शिवसेना न्यायालयात लढली, पण राष्ट्रवादी काँग्रेस नाही – ज्याचा त्याचा मार्ग असतो. मी शिवसेनाप्रमुखांच्या मार्गाने चालणारा आहे. त्यामुळे आमने-सामने करणारा मी आहे. जशास तसं उत्तर देणारा मी आहे. ‘अरे’ ला ‘कारे’ करणारा आहे. त्यामुळे मी लढतोय… पवारसाहेबांची विचारधारा वेगळी असेल आणि त्याप्रमाणे ते जाऊ इच्छित असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. आपण पाहिलं असेल की, हे सगळे राष्ट्रवादीचे आमदार आणि त्यांचे मंत्री… त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर शरद पवार यांचे आशीर्वाद घ्यायला परत त्यांच्या दारात गेले… – माझ्याकडे येण्याची कोणाची हिंमत झाली नाही. बरोबर आहे. त्यासाठी मी आपल्याला हा प्रश्न विचारतोय… – तेच सांगतोय. तुम्ही जे मघाशी म्हणालात की, मी बाळासाहेबांचे विचार सोडले, हे सोडलं ते सोडलं. असं त्यांचं म्हणणं आहे. हे सगळं ढोंग होतं. ते म्हणतात राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो, आता राष्ट्रवादीच्याच हातात म्हणजे अजित पवारांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या गेलेल्या आहेत. त्यापूर्वी 2014 ते 2019 मध्ये जेव्हा सत्ता होती तेव्हा तुम्ही आता ज्यांच्याविषयी बोलताय याच महाशयांनी भाजपबरोबर कसं बसायचं? म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळेचे जे तथाकथित मंत्री होते जे आता गेलेत. मी न सांगता ते बडेजाव मारत होते की आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरतो. कोणी सांगितलं होतं तुम्हाला खिशात राजीनामे घेऊन फिरायला? का वेळ आली होती तुमच्यावर? आणि ही सगळी तुमचीच वक्तव्यं आहेत की, आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो आणि भाजप ज्या पद्धतीने शिवसैनिकांवर, कार्यकर्त्यांवर अत्याचार करतोय, अन्याय करतोय. म्हणून मी त्यांच्यासोबत बसू शकत नाही. म्हणून कल्याणला की डोंबिवलीला जाहीर सभेत राजीनामा देणारे हेच महाशय होते. मग तेव्हा तुम्ही काय सोडलं होतंत आणि मी तरी काय सोडलं होतं? या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वतःला इकडे सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत आणि त्याचा मला उबग आला आहे. आणि म्हणून मी आणखी काहीतरी मिळवायला जातोय असं कोणीच बोलत नाहीये. मला आता सुखाचा वीट आलाय, सगळं मिळालंय, आणखी काय देणार. म्हणून याच्या पलीकडे जाऊन मी काहीतरी मिळवतोय असं बोलून जा ना… आणि हेच सत्य आहे.
जसे फुटीर पवारांच्या दारात गेले… नंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट दिले. पवारांचे फोटो लावून मतं मागताहेत किंवा चर्चा घडवताहेत. अशा प्रकारे शिवसेनेतले फुटीर जर तुमच्या दारात आले… – त्यांची हिंमतच नाही येण्याची. आले तर वगैरेचा विषयच नाही… येऊच शकत नाहीत ते… त्यांची हिंमत नाही. त्यांना माझा स्वभाव माहितेय आणि शिवसेनेची विचारधारा म्हणजेच बाळासाहेबांची विचारधारा काय आहे, हे त्यांना माहिती आहे.