मुंबई, 20 फेब्रुवारी : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द केले आहेत. अशातच आता महापोर्टल मार्फत होणारी शासकीय भरती बंद होणार असून शासन भरतीचे काम नव्या संस्थेला देण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
राज्य शासनातील गट 'क' आणि 'ड'च्या पदभरतीसाठी नव्या संस्थेची निवड केली जाणार आहे. महाआयटी मार्फत या नव्या संस्थेची निवड केली जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे. महापोर्टलबाबत आलेल्या तक्रारीनंतर महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
'महापोर्टल बंद केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसाहेबांचे मनःपूर्वक आभार. आता दुसरं कोणतंही पोर्टल न आणता यापुढील नोकरभरती ही 'एमपीएससी'मार्फतच व्हावी आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 'एमपीएससी'ला ताकद द्यावी, ही विनंती. हे पोर्टल बंद होण्यासाठी माझ्यासह सुप्रिया सुळे आणि अनेक आमदारांनी पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आलं असून राज्यातील हजारो तरुणांना यामुळे दिलासा मिळणार आहे,' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी दिली आहे.
महापोर्टल बंद केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री @OfficeofUT साहेबांचे मनःपूर्वक आभार. आता दुसरं कोणतंही पोर्टल न आणता यापुढील नोकरभरती ही 'एमपीएससी'मार्फतच व्हावी आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 'एमपीएससी'ला ताकद द्यावी, ही विनंती.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 20, 2020
दरम्यान, महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटींमुळे पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
विद्यार्थ्यांसह अनेक नेत्यांचा होता विरोध
महापोर्टलद्वारे नोकरभरती करण्यास विरोध करत हे पोर्टल रद्द व्हावं, या मागणीसाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. विद्यार्थ्यांच्या या मागणीला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit pawar, Uddhav thackeray