मुंबई, 22 नोव्हेंबर : उद्धव ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. ही याचिका प्रधान न्यायाधीश दीपन्कर दत्ता आणि अभय आहुजा यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर आली, पण जजनी नॉट बिफोर मी, असं सांगितलं, त्यामुळे आता ही याचिका नव्या खंडपीठासमोर दाखल केली जाईल. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेची सीबीआय आणि ईडीद्वारे चौकशी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली. आजच्या सुनावणीआधी उद्धव ठाकरे यांचे वकील जोएल कार्लोोस यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणलं की याचिकाकर्त्याने फौजदारी जनहित याचिका नियमांचं पालन करून शपथपत्र दाखल केलं नाही. कोर्टात काय घडलं? दरम्यान आजही ठाकरेंच्या वकिलांकडून भिडे यांनी याचिकेबद्दल असलेले आक्षेप अद्याप दूर केले नसल्याची तक्रार करण्यात आली. याचिकाकर्त्याने मात्र नोंदणीने मागितलेल्या सर्व बाबींचं पालन केलं गेलंय, असा युक्तीवाद केला. यानंतर कोर्टानं नमूद केलं की याचिकाकर्त्यानं व्यक्तिशः योग्यता प्रमाणपत्र सादर केलेलं नाही जे पक्षकारांना वकिलांशिवाय हजर राहण्यासाठी आवश्यक आहे. याचिकाकर्ते उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार न्यायिक यांच्यासमोर हजर होतील, ते तिच्याशी संवाद साधतील आणि नंतर याचिकाकर्त्याला व्यक्तिशः खटल्याचं प्रतिनिधीत्व करण्यास आणि युक्तीवाद करण्यास सक्षम आहे की नाही, हे सांगेल, असं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. सुनावणीदरम्यान काय झालं? गौरी भिडे यांनी त्यांचा लेखी युक्तीवाद कोर्टाला सादर केला. रजिस्ट्रार यांनी सादर केलेला अहवाल वाचून, या अहवालावर दोन्ही जजनी एकमेकांसोबत चर्चा केली. रश्मी आणि तेजस ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अशोक मुंदरंगी कोर्टात हजर झाले. ‘रजिस्ट्रार यांनी आम्हाला अहवाल सादर केला आहे. या केसमध्ये तुम्हाला स्वत:ला युक्तीवाद करायचा आहे, पण रजिस्ट्रार यांच्या अहवालानुसार काही तांत्रिक मुद्द्यावर तुम्हाला युक्तीवाद करायला जमणं अवघड आहे. युक्तीवाद करण्यासाठी तुम्हाला कोर्टाकडून वकील हवा आहे का?,’ असा सवाल चीफ जस्टीस यांनी गौरी भिडे यांना विचारला. यानंतर कोर्टाचा निर्णय मला मान्य आहे, असं गौरी भिडे यांनी चीफ जस्टीस यांना सांगितलं. गौरी भिडे यांनी वकील घ्यायला होकार दिल्यानंतर चीफ जस्टीस दीपन्कर दत्ता आणि जस्टीस अभय आहुजा यांनी काही मिनिटं चर्चा केली. ‘ठीक, पण हे मॅटर NOT BEFORE ME. तुमची केस दुसऱ्या बेंचसमोर,’ असं चीफ जस्टीस यांनी गौरी भिडे यांना सांगितलं. आता काय होणार? चीफ जस्टीस यांचा नॉट बिफोर मी चा सविस्तर आदेश अपलोड केला जाईल. यात काय कारण नमूद करण्यात आलं आहे, हे स्पष्ट होईल. यानंतर न्यायाधीश गंगापूरवाला यांच्या बेंचसमोर याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. यानंतर पुन्हा नवीन बेंच तयार केलं जाईल आणि सुनावणी निश्चित होईल. ठाकरेंच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी, आदित्य ठाकरे म्हणतात… याचिकेतले मुद्दे प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे नेमकं स्त्रोत काय आहेत? हा प्रश्न त्यांनी याचिकेद्वारे उपस्थित केला. यासोबतच कोरोना काळात सामना या वृत्तपत्राला इतका फायदा कसा काय झाला? हा प्रश्नही याचिकेत विचारण्यात आला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री असताना 2020 ते 2022 या कोरोना काळात सामना वृत्तपत्राचा टर्नओव्हर 42 कोटी रुपये इतका होता, ज्यात झालेल्या साडे अकरा कोटी रुपयांच्या नफ्यावरदेखील प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. शिवाय उद्धव ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाचा नेमका स्त्रोत काय? असा सवाल विचारताना त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी व्हावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. कोण आहेत गौरी भिडे? गौरी भिडे या प्रकाशक आहेत, त्यांच्या आजोबांचं ‘राजमुद्रा’ नावाचं प्रकाशन आहे. सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून एवढी संपत्ती गोळा करणं अशक्य असल्याचा आरोप गौरी भिडे यांनी केला आहे. आपलाही हाच व्यवसाय असून दोघांच्या उत्पन्नात एवढा फरक कसा? असा सवाल गौरी भिडे यांनी विचारला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.