सातारा, 07 मे : सर्वोच्च न्यायालयानं (Supreme court) मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle Reaction) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी असला तरी राज्य सरकारने (Maharashtra Government) मराठा आरक्षणाबाबत नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे असं ते म्हणाले... विशेष म्हणजे आंदोलन करून काय होणार, आपल्या लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, अशी आक्रमक भूमिका उदयन राजेंनी घेतली आहे.
उदयनराजे यांनी मराठा समाजाला नाकारण्यात आलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. आरक्षण जर
आर्थिक दृष्ट्या दुर्बल सर्व जाती जमातींन लागू होतं, तर मग त्यात फक्त मराठ्यांना का बाजुला केलं जातं. फक्त मराठ्यांनाच हे आरक्षण का लागू होत नाही, असा सवाल उदयनराजे यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला असला तरी नागरिकांनी निवडून दिलेल्या आमदार खासदारांचंही कर्तव्य आहेच. त्यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारायला हवी असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे. राज्यातले विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते यावर भाष्य का करत नाहीत, ते शांत का आहेत असा सवालही उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे.
(वाचा-कोरोनामुळे होतंय भयंकर इन्फेक्शन; जीव वाचवण्यासाठी 8 रुग्णांचे काढावे लागले डोळे)
राजकारण गेलं चुलीत...
प्रत्येक मुद्द्यावर राजकारण करून चालणार नाही. राजकारण गेलं चुलीत आता समाजाचा विचार करणं गरजेचं असल्याचं उदयनराजे म्हणाले. त्याचबरोबर मराठा तरुणांनी आता आंदोलन करत बसण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा तुमच्या भागातील लोकप्रतिनिधी आमदार, खासदारांना प्रश्न विचारा. कोणत्याही पक्षाचे आमदार खासदार असतील तर त्यांना घराबाहेर पडू देऊ नका त्यांना प्रश्न करा आणि उत्तरं मागा असंही उदयनराजे म्हणाले आहेत.
(वाचा-8 महिन्याच्या बाळाला आईनं दिला दुसरा जन्म; यकृतदान करून माऊलीनं वाचवला जीव)
या मुद्द्यावरून एकमेकांकडे बोटं दाखवून आता समस्या सुटणार नाही असंही उदयनराजे म्हणाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं केलेला कायदा रद्द करत सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केलं. त्यानंतर विविध क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे. उदयनराजेंनीही अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत थेट मराठा तरुणांना लोकप्रतिनिधींना घेराव घालण्याचा जणू आदेशच दिलाय. त्यामुळं आता या प्रकरणावर भविष्यात नेमक्या कशा घडामोडी घडणार हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.