किशोर गोमाशे,
वाशिम, 26 ऑक्टोबर: वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहराजवळ नागपूर-मुंबई महामार्गावर दोन भरधाव दुचाक्यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. धडक एवढी भीषण होती की एक दुचाकी जळून खाक झाली. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. कृष्णा कृषी बाजारसमोर हा अपघात झाला.
या अपघातात कोमल संजय राठोड (वय-35), महेश सुरेश सुर्वे (वय-18) आणि शिवा इंद्रसिंग राठोड (वय-22) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आली असता तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाली.
हेही वाचा...राष्ट्रवादीत जाताच 'चॉकलेट'वरून एकनाथ खडसेंनी केला चंद्रकांत पाटलांवर पलटवार
दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू
दरम्यान, याच महामार्गावर आणखी एक अपघात झाला आहे. मंगरुळपीर शेलुबाजार या टी पॉईंट नजीक हा झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे. राजू जोगदंड असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
मिळालेली माहिती अशी की, राजू जोगदंड (रा. घोटा) हे मंगरुळपीरवरून कारंजाकडे दुचाकीवरून येत असताना त्यांच्या दुचाकीला मालवाहू मिनी ट्रकचा मागील बाजूचा धक्का लागला. धक्का बसताच राजू जोगदंड रस्त्यावर कोसळले.या अपघातात राजू जोगदंड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.
एकाच महामार्गावर काही वेळाच्या अंतराने या दोन अपघाताच्या घटना घडल्यानं दुचाकीस्वारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
दरम्यान, सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर धुळे ते नवापूर दरम्यान विसरवाडीजवळ कोंडाईबारी घाटात गेल्या आठवड्यात एका खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात 6 जणांचा मृत्यू होऊन 20 प्रवासी गंभीर जखमी झाले होते.
हेही वाचा..ठाकरे सरकारची मोठी घोषणा, कोरोना चाचणीच्या दराबद्दल घेतला महत्त्वाचा निर्णय
जळगावहून सुरतकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात धुळे ते नवापूर दरम्यान विसरवाडी येथे बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास झाला आहे. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्स घाटातील पुलाखाली कोसळून सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले.