नागपूर, 8 जुलै: नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापालिकेतील सत्ताधारी भाजपनं भ्रष्टाचाराचा आणखी एक गंभीर आरोप केला आहे. 'सी डॅट' कंपनीला चुकीच्या पद्धतीनं कंत्राट दिलं, स्मार्ट सिटी कंपनीचं काम करणाऱ्या एल & टी कंपनीवर दबाव आणून सी डॅट कंपनीला 2 कोटी 80 लाखांचे बेकायदा काम देण्यास दबाव आणला, असा आरोप मनपाच्या विधी समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.
हेही वाचा...फेसबुकवर महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून करायचा असा गोरखधंदा, नंतर झाली फजिती
चुकीच्या पद्धतीनं वर्कऑर्डर दिल्यानं यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे. या प्रकरणाची राज्य शासनाकडे तक्रार केली जाणार असून राज्य शासनानं चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही मेश्राम यांनी केली आहे.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. दोन दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे यांना राष्ट्रीय महिला आयोगानं नोटिस बजावला आहे. महापालिकातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा मानसिक छळ केल्याचा ठपका तुकाराम मुंढे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
भानुप्रिया ठाकूर यांनी महिला आयोगाकडे तुकाराम मुंढे यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर महापालिका प्रमुख अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांच्याकडून महिला आयोगानं खुलासा मागितला आहे. गेल्या काही दिवसांपासून पदाधिकारी नगरसेवक आणि तुकाराम मुंढे यांच्यात वाद सुरू होते. या पार्श्वभूमीवर नोटीस आल्याने तर्कवितर्क लावले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
भानुप्रिया यांनी केलेल्या तक्रारीनुसार, तुकाराम मुंढे प्रसुती हक्क नाकारले. एवढंच नाही तर नोकरीवरुन काढून टाकण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही पाठवली. तुकाराम मुंढे यांनी आपल्याला अपमानजनक वागणूक दिली आणि मानसिक छळ केल्याचं भानुप्रिया ठाकूर यांनी महिला आयोगाला दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
हेही वाचा...
भानुप्रिया यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाकडून तुकाराम मुंढे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यावर अद्याप तुकाराम मुंढे यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.