जळगाव, 26 मार्च : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी संपूर्ण राज्यात 28 मार्चापासून नाईट कर्फ्यूची (Night Curfew) घोषणा केली आहे. तसंच काही जिल्ह्यांत कोरोनामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याने लॉकडाऊन करण्याची मुभाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात 28 ते 30 मार्च या दरम्यान विशेष निर्बंध (Lockdown in Jalgaon District) लादण्यात आले आहेत. बाजारपेठांसह किराणा दुकाने, फळ भाजीपाला केंद्रे, लिकर शॉप बंद राहणार आहेत. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आणि त्यातच 28 व 29 मार्च रोजी होळी व धुलिवंदन सण आल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. परिणामी कोरोनाचा फैलाव अधिक वाढण्याची शक्यता गृहित धरून जिल्हाधिकार्यांनी 28 मार्च रोजी रात्री 12.01 ते 30 मार्च रोजी रात्री 12 वाजेदरम्यान विशेष निर्बंध जिल्ह्यात लागू केले आहेत. हेही वाचा - देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारनं उचललं पाऊल, गृह मंत्रालयाचे राज्यांना कडक निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊनबाबत नेमके काय आदेश दिले? रुग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावतांना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू, मुख्यमंत्री काय म्हणाले? वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याचं सांगत संपूर्ण राज्यात रविवारपासून (दिनांक 28 मार्च 2021) रात्रीची जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.