मुंबई, 10 फेब्रुवारी : काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तसंच, 'काँग्रेसमध्ये कोणतेच वाद नाही. ही भाजपनं उठवलेली वावडी आहे' अशी टीकाही पटोलेंनी केली.
नाना पटोले यांनी मुंबईमध्ये पत्रकार घेतली होती. यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल भूमिका स्पष्ट केली.
काँग्रेसमध्ये कोणतेच वाद नाही. ही भाजपनं उठवलेली वावडी आहे. पदवीधर निवडणुकीमध्ये विदर्भात झालेला पराभव भाजपला जिव्हारी लागला आहे म्हणून विषय डायव्हर्ट करण्यासाठी अश्या खोट्या बातम्या पेरतं आहे, भाजपात अंतर्गत खदखद आहे, आमच्यात नाही. पक्ष कार्यालय सगळ्यांसाठी, कोणताही नेता तिथे बैठक घेऊ शकतं. रायपूरला राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक आहे. यानंतर बरेच फेरबदल होतील, असं नाना पटोले म्हणाले.
(..तर कदाचित सरकार वाचले असते, राष्ट्रवादीनेही फोडले पटोलेंवर खापर)
बच्चू कडू यांनी 15 आमदार फुटण्याचा दावा केला आहे. पण अश्या कोणाच्या बोलण्यावर बोलण्यात काही अर्थ नाही. असं काहीही घडणार नाही, असं म्हणत नाना पटोलेंनी बच्चू कडूंना टोला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येताय ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र प्रश्न सुटणं महत्वाचं आहे. मन की बात बोलणाऱ्यांना मनातलं सांगत नाही. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर द्या. लोकसभा, राज्यसभेत बोलला नाही निदान मुंबईत बोला. शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी यावर बोला, असा टोलाही पटोलेंनी पंतप्रधान मोदींना लगावला.
(कोण रोहित पवार? प्रणिती शिंदेंनी कडक शब्दात सुनावलं)
भराडी यात्रेत फडणवीस यांनी मुंबई पालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडला. कारण लोकच जमत नाही म्हणून नरेंद्र मोदी यांना बोलवावं लागतं. मात्र, मोदी कितीही वेळा आले तरी फरक पडणार नाही, असंही पटोले म्हणाले.
माझ्या शक्तीची जाणीव करून देणाऱ्या संजय राऊत यांना धन्यवाद, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय केलं ? हे सांगावं. राज्यात अनेक प्रश्न आहेत त्यात त्यांनी लक्ष घालावं ही माझी विनंती आहे. हायकमांडनं घेतलेल्या निर्णयावर बोलू नये आणि संजय राऊत यांनी वादावर पडदा पाडावा, असा सल्लावजा टोलाही पटोलेंनी राऊतांना लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress