येवला, 4 जुलै: राज्याचे नागरी व अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. येवल्यात आज (शनिवारी) तर कोरोनाचा विस्फोटच झाला. एका दिवसात येवल्यात 23 नवे रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
येवल्यात सध्या 164 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 101 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हेही वाचा...राष्ट्रवादीने ज्येष्ठ नगरसेवक गमावला, 'दत्ताकाका' यांचं कोरोनामुळे निधन
नाशिक शहरात 188 तर जिल्ह्यात एकूण 280 पॉझिटिव्ह
नाशिक शहरासह जिल्ह्यातील संशयितांच्या चाचण्यांमध्ये शुक्रवारी एकूण 280 पॉझिटिव्ह आले आहेत. या नवीन कोरानाबाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक 188 तर येवल्याचे 22 रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 13 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील 9 नाशिक शहरातील आहहेत. त्यामुळे जिल्ह्यात मृतांची एकूण संख्या 261 झाली आहे.
नाशकातील कोरोनाबाधित व मृतांची वाढलेली संख्या चिंताजनक ठरली आहे. फक्त नाशिक महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 122 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या तुलनेत मालेगावमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यात नागरिकांना यश आले असून त्या बरोबरच मृतांचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात येवला व सिन्नर येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
नाशिकसह जिल्ह्यातील 628 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. त्यात नाशिक क्षेत्रातील 263, मालेगाव क्षेत्रातील 157, जिल्हा ग्रामीण भागातील 208 संशयितांच्या अहवालांचा समावेश आहे.
हेही वाचा...कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सरकारची नवी गाइडलाइन, कमी केला 'या' औषधाचा डोस
परिवारातील लोकांना मिळेल उपचारांची माहिती
जिल्हा रुग्णालयात करोना रुग्णांसाठी मोबाइल व टीव्ही संच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. रुग्ण व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधतील. परिवारातील लोकांनादेखील उपचाराची सगळी माहिती मिळेल. टीव्हीद्वारे रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना तणावमुक्त ठेवले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.