नितीन नांदूरकर, प्रतिनिधी
जळगाव, 15 ऑक्टोबर : अंधेरी पोटनिवडणुकीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यामध्ये शीतयुद्ध पेटले आहे. 'निवडणुका घरात बसून किंवा ऑनलाईन होत नाही. होईल तर समोरासमोर पण होईल, असं म्हणत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे. तसंच, गिरीश महाजन यांनी यापुढे शांतपणे बोलावं, असा सल्लाही पाटील यांनी दिला.
जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत असताना गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांची व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणामध्ये जोरदार पाठराखण केली.
(Andheri East Bypoll : अंधेरीच्या रणांगणात 6 जण मैदानात, लटके-पटेलांसमोर तिघांचं चॅलेंज!)
'गिरीश महाजन यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता, त्यांनी मंत्री गिरीश महाजनांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक वेळी आपण मुडमध्ये राहू असे नसते ना., लोकप्रतिनिधी हा सुद्धा एक माणूस असतो, महाजनांनी सांगितल की, फाईल रद्द केली असेल, तर समोरच्या ऐकणाऱ्याला गिरीश महाजन जोरात बोलले असे वाटले असेल, गिरीश भाऊंना विनंती करू की, यापुढे शांत बोला, असंही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी बोलतांना सांगितले.
हे खडसेंनी चॅलेंज देवून सांगावं - पाटील
सट्टा-पत्ता अवैधधंद्ये याबरोबरच विविध विषयायांवर एकनाथ खडसे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. यावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंना जोरदार उत्तर दिले आहे. 'कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यात अवैध धंदे असतील हे मी मान्य करतो, मात्र खडसे सुद्धा पालकमंत्री होते, त्यावेळी अवैधधंदे नव्हते, हे नव्हते, हे खडसेंनी चॅलेंज देवून सांगावं, असं आव्हान गुलाबराव पाटील यांनी खडसेंना दिले आहे.
(अंधेरी पोटनिवडणुकीत 'मशाल' सोडणार साथ? ठाकरे पुन्हा गोत्यात!)
तसंच, पोलीस त्याच्या परीने अवैध धंदे कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र थेट पोलिसांना टार्गेट करायचं, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही, हे चुकीचं असल्याचं मतही मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. यातील दोषींवर सरकारमधून आम्ही सुद्धा कारवाई करणार असल्याचेही यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले.
एकनाथ खडसेंच्या आंदोलनावरुन जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्यातील कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसली असल्याची टीका शिंदे सरकारवर केली होती. या टीकेचाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला आहे. 'धाबं तर मी काही पाहिलं नाही मात्र कायदा व सुव्यवस्था आहे, उपहासात्मक टोला, गुलाबराव पाटील यांनी जयंत पाटील यांना लगावला आहे.
शिंदे गटाच्या आमदारालाच मंत्री गुलाबराव पाटलांनी डिवचले
शिंदे गटाचे आमदार यांच्याविरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या तालुक्यात पाणी पुरवठा योजनेच्या कामांना मंजुरी दिल्यावरुन आमदार चिमणराव पाटील हे नाराज झाले असल्याची चर्चा आहे, यावर विचारले असता, ही पाणीपुरवठ्याची योजना असून त्यासाठी माझ्याकडे कम्युनिष्ट पक्षाचा जरी माणूस आला तरी ती योजना मंजूर करणार असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी त्यांच्याच शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील यांना डिवचले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news