मुंबई, 11 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून सर्वाधिक रुग्ण संख्याही महाराष्ट्रात आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याची बाब चिंताजनक आहे. अशात राज्यात लॉकडाउन (Lockdown) लावण्यासंबंधी निर्णय घेण्याच्या चर्चाही सुरू आहेत. या संपूर्ण परिस्थितीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्रातील धुळ्यात (Dhule), प्रशासनाचा मोठा बेजबाबदारपणा समोर आला आहे. धुळ्यात एका 70 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शुक्रवारी ते रुग्णालयातून घरी परतही आले. परंतु त्याच दिवशी घरीच त्यांचं निधन झालं. निधनानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह गावातून नेण्यासाठी प्रशासनाकडे रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली. परंतु तब्बल दहा तासांच्या प्रतिक्षेनंतरही प्रशासनाकडून त्या कुटुंबियांना रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली नाही. शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत रुग्णवाहिका न मिळाल्याने गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह, गावातल्याच एका कचरा उचलणाऱ्या वाहनातून अंतिम संस्कारासाठी नेण्यात आला. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती चिंताजनक आहे. शनिवारी राज्यात कोरोनाचे 55,411 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर एका दिवसात 309 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 33,43,951 इतकी झाली असून 57,638 जणांचा बळी गेला आहे. सध्या महाराष्ट्रात 5,36,682 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.
(वाचा - कोरोनामुळे वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यास मुलाचा नकार, मुस्लीम तरुणाने दिला अग्नी )
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची चिंताजनक परिस्थिती पाहता, लॉकडाउन करण्याचे संकेत दिले आहेत. कोरोनाची ही चेन तोडण्यासाठी कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

)







