जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा तारा निखळला, शरद पवारांचे विश्वासू सहकारी चौघुले यांचं निधन

ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा तारा निखळला, शरद पवारांचे विश्वासू सहकारी चौघुले यांचं निधन

ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा तारा निखळला, शरद पवारांचे विश्वासू सहकारी चौघुले यांचं निधन

मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू असताना अचानकपणे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं दुःखद निधन झाले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 25 जुलै : ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा शिक्षण महर्षी महादेव बाबुराव चौघुले ( 76 ,रा.वडूनवघर ,भिवंडी) यांचे शनिवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू असताना अचानकपणे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या अकाली निधनाने राजकीय व शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. महादेव चौघुले यांना काल सायंकाळी चार वाजेच्या सुमारास राहत्या घरी रक्तदाब वाढल्याने ते बेडरूममध्ये चक्कर येऊन भिंतीवर कोसळून पडले. त्यावेळी त्यांच्या डोक्याच्या पाठीमागील भागास जोरदार मार लागून दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना कुटुंबीयांनी बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी तात्काळ मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा आज सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले व तीन विवाहित मुली ,चार भाऊ ,पाच भावजयी,नातवंडे ,पतवंडे असा 45 जणांचा एकत्रित परिवार आहे. ते गेल्या 35 वर्षांपासून सक्रिय राजकारण व समाज कार्यात कार्यरत होते. त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेसमधून झाला असून त्यांनंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्याने त्यांनी त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला व ते सक्रियपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठाणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. महादेव चौघुले यांनी ठाणे जि.प.च्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतीपद देखील भूषविले होते. सद्या ते परिविक्षाधीन आणि अनुरक्षण संघटना (बाल सुधारगृह ) महाराष्ट्र राज्य ,पुणे या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी 20 वर्षांपूर्वी साई शिक्षण सेवा समिती या सामाजिक संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून खार्डी (पायगांव) ,वडूनवघर येथे माध्यमिक शाळा तर राहनाळ (अंजूरफाटा ) येथे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय तसेच लॉ आणि बी - फार्मसी कॉलेज सुरू करून शहरासह ग्रामीण भागातील गरीब ,गरजू ,आदिवासी विद्यार्थ्यांची शिक्षणाची व्यवस्था केली आहे. त्यांच्याकडे उत्कृष्ठ वक्तृत्वाची कला अवगत असल्याने ते तासंतास प्रेक्षक अथवा कार्यकर्त्यांना खिळवून ठेवत होते.                    दिवंगत महादेव चौघुले हे राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना त्यांचा विविध समाज व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. त्यामुळे त्यांच्या निधनाची वार्ता समजताच ठाणे जि.प.चे शिवसेना सदस्य सुरेश (बाळ्या मामा ) म्हात्रे ,नगरसेवक विकास पाटील ,पं. स. सभापती विकास भोईर, कमलाकर टावरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश गुळवी, राष्ट्रवादीचे युवकचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील ,तालुका उपाध्यक्ष विशाल पाटील ,जि.प.सदस्या रत्ना तांबडे ,पं. स.सदस्या नमिता राजेश पाटील सरपंच सोनम चौघुले, शाखा प्रमुख सुरेश पाटील, गणेश पाटील, जयदास पाटील, विकास पाटील, माजी सरपंच संभाजी चौघुले, सुधाकर चौघुले ,सचिन पाटील आदींसह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCP , thane news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात