ठाणे, 2 डिसेंबर: कोरोना या महाभयंकार साधीच्या आजारावरील लस कधी येईल, कोणती लस येईल याचा अद्याप थांगपत्ता नसताना ठाणे महानगरपालिकेच्या महापौरांनी एक अजब मागणी केली आहे. कोरोनाची लस आल्यानंतर ती सर्वप्रथम नगरसेवक, आमदार आणि खासदारांना द्यावी, अशी मागणी ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
लोकप्रतिनिधी हे कायम लोकांच्या संपर्कात असतात. कोरोना काळात लोकप्रतिनिधींनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केलं आहे. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका जास्त होता किंबहुना आहे. यामुळे लोकप्रतिनिधींना आधी लस द्यावी, अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे.
हेही वाचा....ठाकरे सरकार घेणार आणखी एक महत्त्वाचा निर्णय, जातीवाचक नावं हद्दपार होणार
गंमत म्हणजे ज्या जनतेने महापौर नरेश म्हस्के यांना निवडून दिलं जी जनता लोकप्रतिनिधी निवडते, त्या जनतेला हे असे लोकप्रतिनिधी जुमानत नाहीत, हे पुन्हा एकदा महापौर नरेश म्हस्के यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं आहे. निवडणुका आल्या की जनतेसमोर लोटांगण घालणारे हे लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर मात्र मतदारांनाच विसरतात, त्याचे हे उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल. महापौर नरेश म्हस्के यांच्या या मागणीचा विरोधकांकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासह आठ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी लस वाटपाबाबत आढावा बैठक घेऊन महत्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक अजब मागणी केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी तसेच आमदार, खासदार यांनीही आपला जीव धोक्यात घालून कोरोनारुग्णांची अहोरात्र सेवा केली असून, काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर लसीचा प्राधान्यक्रम ठरविताना आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा देखील अग्रकमाने समावेश करावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्राद्वारे केली आहे.
हेही वाचा...हा काही पर्स नेण्याचा प्रकार नाही, योगी आदित्यनाथ यांचं ठाकरे सरकारवर पलटवारमनसे नेते म्हणाले...
कोरोनाची लस आल्यावर ती डॉक्टर, पोलीस व इतर आरोग्य सेवकांना प्रथम देण्यात येणार असे काल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घोषणा केली. परंतु या बरोबरच सर्व सैनिक, माजी सैनिक व त्यांच्या परिवाराला अग्रक्रमाने लसीकरण करण्यात यावं. कारण हे सर्वच देशासाठी बलिदान देण्यात अग्रेसर असतात, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.