मुंबई, 18 एप्रिल : ठाकरे सरकार गेल्यापासून ठाकरे गटाच्या आमदारांमागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार राजन साळवी हे पत्नी, भाऊ, दोन मुलांसह आज अलिबाग तालुक्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीला सामोरे गेले. यावेळी आमदार साळवी यांची व त्यांच्या कुटुंबीयांची सुमारे आठ तास अधिकाऱ्यांनी चौकशी केली. यापूर्वी आमदार साळवी यांची 14 डिसेंबर व 20 जानेवारी, 22 फेब्रुवारी रोजी तर त्यांचे स्विय सहाय्यक सुभाष मालप यांची ३ फेब्रुवारी रोजी चौकशी केली होती.
आमदार राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मालमत्तेच्या चौकशीसाठी नोटीस बजावली होती. यावेळी आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक असून चौकशीला घाबरत नाही असे स्पष्ट करीत आमदार साळवी हे या चौकशीला सामोरे गेले. तसेच त्यांनी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले. त्यांच्यासह कुटुंबीयांकडे असलेल्या मालमत्तेची माहिती त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती. तसेच आपल्याकडे संशय घेण्याइतपत बेकायदा मालमत्ता नसल्याचे सांगितले होते. तसेच मालमत्ते संदर्भातील कागदपत्रे सादर केली होती. दरम्यान, त्यांच्या स्विय्य सहाय्यक सुभाष मालप यांचीही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली होती. वाचा - अजितदादांनी फटकारल्यानंतरही संजय राऊत ठाम, म्हणाले… आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी, भाऊ दिपक साळवी, मुले शुभम साळवी व अथर्व साळवी यांच्यासह भाऊ दिपक साळवी यांचे मित्र सुरेंद्र भाटकर यांची चौकशी केली. यावेळी राजन साळवी यांच्या कुटुंबीयांनी आपण करीत असलेल्या व्यवसायाबद्दल तपासीक अधिकारी यांना माहिती दिली आहे. दरम्यान बुधवारी पुन्हा आमदार साळवी कुटुंबीयांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशी करण्यात येणार आहे. मागील चार महिन्यांपासून आमच्या संपत्तीची चौकशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी करीत आहेत. आम्ही त्यांना तपासात पूर्ण सहकार्य केले आहे. आमच्याकडे असलेल्या संपत्तीचा तपशील दिला आहे. आज कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. उद्या पुन्हा चौकशी करण्यात येणार असून, उद्या चौकशी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

)







