जामनेर, 31 मे : 'कापूस, मका, ज्वारी आदींच्या खरेदीबाबत सरकार व प्रशासनात कुठलाही ताळमेळ दिसत नाही. खरेदी केंद्र सुरू झाले असले तरी अनेक उणिवा समोर येत असल्याने शेतकरी वर्ग पूर्णतः हैराण झाला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची ठाकरे सरकारने घोर फसवणूक केल्याचा आरोप माजी मंत्री आणि आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील शासकीय मका खरेदी केंद्राचा शुभारंभ गिरीश महाजन यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा -कोरोनाचा संसर्ग रोखणारा अनोखा ट्रॅक्टर, नाशिकच्या शेतकऱ्याचं मोदींकडून कौतुक
'लोकप्रतिनिधींच्या नात्याने माझ्या हातून या खरेदी केंद्राचा शुभारंभ होत असला तरी, अनेक दिवस खरेदी रखडल्याने कवडीमोल भावात आपला माल शेतकऱ्यांनी बाहेर बाजारात विकून टाकला. आता शासकीय केंद्र सुरू झाले असले तरी अपुऱ्या बारदानामुळे पूर्ण क्षमतेने आलेल्या मालाची मोजणीच होणार नाही' अशी टीका महाजन यांनी केली.
हेही वाचा -मजुराच्या जेवणात आढळला विंचू, क्वारंटाइन सेंटरमधला अनागोंदी कारभार
तसंच, 'पावसाळा तोंडावर आला तरी पिकांच्या नुकसानीची घोषित करण्यात आलेली वाढीव मदत अद्यापही या आघाडी सरकारने दिलेली नाही, कर्जमाफी बाबतही आनंदी-आनंदच आहे. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणाऱ्या हे महाविकास आघाडीचे सरकार कोरोनासह सर्वच आघाड्यांवर फोल ठरल्याचीही टीका आमदार महाजन यांनी केली.
संपादन - सचिन साळवे