विपिन कुमार दास, दरभंगा, 31 मे : कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी आपापल्या घरी पोहोचलेल्या मजुरांना त्यांच्या घरी न पाठवता क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. मात्र दिवसेंदिवस या क्वारंटाइन सेंटरमधून अस्वच्छता, अपुरे नियोजन अशा अनेक बातम्या समोर येत आहेत. आता एका मजुराला क्वारंटाइन सेंटरमध्ये देण्यात आलेल्या जेवणामध्ये विंचू आढळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर टीका करण्यात येत आहे. मनोज यादव नामक श्रमिकाच्या बाबतीत ही घटना घडल्यानंतर मजुरांमध्ये एकच गोंधळ उडाला.
दरभंगा - जेवणात विंचू आढळल्याने मजुरांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळाले
बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यामध्ये हा किळसवाणा प्रकार घडला. याठिकाणी एका माध्यमिक शाळेत मजुरांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. विषारी विंचू पडलेलं जेवण जेऊन काही मजूर आजारी देखील पडले आहेत. आपल्या साथीदाराच्या जेवणात विंचू आढळल्याने मजुरांमध्ये धास्ती पसरली आहे. जेव्हा मनोज यांच्या जेवणात विंचू सापडला तेव्हा एकूण 10 जण जेवण जेवत असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान हा मेलेला विंचू सापडल्यानंतर एकूण 45 मजुरांनी जेवणावर बहिष्कार टाकला आहे. (हे वाचा- UNLOCK 1.0 : सरकारकडून नवीन गाइडलाइन जारी, वाचा कधी सुरू होणार चित्रपटगृहं) दुपारी 3 वाजेपर्यंत अनेक मजूर उपाशीच होते. ज्यांनी जेवण केलं होतं त्यापैकी दीपक पासवान, प्रकाश यादव, राजेश यादव, प्रमोद पासवान इत्यादींना उलटी झाली. याबाबतची माहिती मुख्याध्यापक राम यादव यांना देण्यात आली. त्यांनी याबाबात सीओ आणि नोडल अधिकारी अजित कुमार झा यांना याबाबत कळवले. त्यानंतर सीओ एमओआयसी डॉ. निर्मल कुमार लाल यांच्याबरोबर घटनास्थळी दाखल झाले. डॉ.लाल यांनी तपासणी करून मजुरांना काही औषधं देऊ केली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. (हे वाचा- सोमवारपासून सुरू होत आहेत 200 रेल्वे गाड्या, प्रवासाआधी जाणून घ्या हे नियम ) दरम्यान या एकंदरित प्रकाराबाबत मुख्याध्यापकांनी माफी मागितली असून परत असा प्रकार होणार नाही असे आश्वासन दिले आहे. याठिकाणच्या प्रवाशांनी अशी माहिती दिली की याआधीही त्यांना जेवणात किडे मिळाले होते.