पाडव्यापासून मंदिरं उघडणार...पण मंदिरात प्रवेश करण्यासाठी 'या' नियमांची सक्ती

पाडव्यापासून मंदिरं उघडणार...पण मंदिरात प्रवेश करण्यासाठी 'या' नियमांची सक्ती

सर्व भाविकांना नियम, शिस्तीचे काटेकोर पालन करावेच लागेल....

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर: ही 'श्रींची इच्छा! मंदिरे, प्रार्थनास्थळे (Temple) उघडत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांनी दिवाळीच्या दिवशी केली आहे. पाडव्यापासून (16 नोव्हेंबर) राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यभरात या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे.

प्रार्थनास्थळे खुली केल्यानंतर सर्व भाविकांना नियम, शिस्तीचे काटेकोर पालन करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळावी आणि स्वतः बरोबर इतरांचे संरक्षण करावं. मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा...दिवाळीच्या दिवशीच कोकणावर शोककळा, दापोलीच्या समुद्रात 3 तरुण बुडाले

काय आहे मुख्यमंत्र्यांचं आवाहन?

मुख्यमंत्री म्हणाले, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झालं आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासूर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मियांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळली. या पुढेही जनतेनं शिस्त पाळायची आहे. नागरिकांनी मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे, हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

कोरोनाच्या काळात राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा', असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा..मोठी बातमी, विधान परिषद आमदारांच्या यादीतून काही नावं वगळणार?

दरम्यान, कोरोना संसर्गामुळे गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील मंदिरं बंद होती. अखेर दिवाळीच्या दिवशी मंदिरं उघडण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार आहेत. या निर्णयांमुळे भाविकांमध्ये आनंदचं वातावरण निर्माण झालं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 14, 2020, 4:16 PM IST

ताज्या बातम्या