मुंबई, 9 मार्च : राज्यात अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने उन्हाचा पारा थोडा घसरला आहे. मात्र, तरी येत्या काही दिवसांत ही परिस्थिती बदलणार असून पारा उसळी घेणार आहे. तसेच या तापमानामध्ये 3 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई तापणार -
मुंबई, कोकण, गोवा महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात दिवसाच्या कमाल तापमानात ही वाढ नोंदवली जाईल. मुंबई-कोकणपट्ट्यात तर उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती उद्भवू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी वातावरण पूर्णपणे साफ होईल आणि स्वच्छ वातावरण जाणवेल. विदर्भातील 11 जिल्ह्यांत मात्र 9 ते 10 मार्च दरम्यान तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात कमाल तापमानाच्या तुलनेत एकूणात अंदाजे 6 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई तापली! सोमवारी देशातील सर्वोच्च तापमानाची झाली नोंद
मुंबईत उन्हाने उचल खाल्ली -
मुंबई शहर आणि उपनगरात उठलेल्या धुळीच्या वादळामुळे मंगळवारी सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. त्यात हवामानात झालेल्या बदलामुळे दोन दिवस मुंबईत ढगाळ वातावरण होते. बुधवारी हवामानात पुन्हा एकदा बदल झाले. यानंतर ढगाळ हवामान निवळल्यानंतर आता उन्हाने उचल खाल्ली आहे.
तसेच 15 ते 20 मार्च दरम्यान कदाचित 1 ते 2 दिवस मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्ह्यांत किरकोळ पावसाची शक्यता आहे, असे निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Mumbai, Todays Weather, Weather, Weather Update