मुंबई, 29 मार्च : शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आलं. दरम्यान, शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये खात्यांबाबत नाराजी असल्याच्या चर्चा होत असतात. आता राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उघडपणे आपल्याला मिळालेलं खातं पसंत नव्हतं असं विधान केलंय. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे शिंदेंच्या मंत्रिमंडळात अनेकजण नाराज असल्याची चर्चा आहे.
आरोग्य खातं मला पसंत नव्हतं असं सांगत तानाजी सावंत यांनी आपली नाराजी उघड केली. ते म्हणाले की, राज्यातील सत्ता बदलानंतर आपणास आरोग्य खात दिलं. मात्र आपल्याला आरोग्य खातं पसंत नव्हतं. मी नाराज होतो तरीही सेवाभावी वृत्तीने काम करत असून आता खाते आवडत आहे.
पालकमंत्रीपदाबद्दलही वक्तव्य
सोलापूरच्या पालकमंत्री पदाबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. धाराशिव आणि परभणीचे पालकमंत्री पद आपल्यास दिले. मात्र सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्याला हवे होते. अजून माझे नेते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते विचार करतील असे तानाजी सावंत यांनी म्हटलं.
बाळासाहेब ठाकरे अन् वाजपेयींशी स्वत:ची तुलना
तानाजी सावंत यांनी स्वत:चं कौतुक करताना थेट अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे आणि लालकृष्ण आडवाणी यांच्याशी तुलना केलीय. त्यांनी म्हटलं की, पंढरपूरच्या मैदानात स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयीं , हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण आडवाणी यांच्या सांभाना मैदान भरले नाही. पण ते मैदान सावंत बंधूनी किमया करून भरून दाखवले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.