Home /News /maharashtra /

SPECIAL REPORT : शिवसेनेच्या नगरसेवकांनी का केला राष्ट्रवादीत प्रवेश? हे आहे कारण

SPECIAL REPORT : शिवसेनेच्या नगरसेवकांनी का केला राष्ट्रवादीत प्रवेश? हे आहे कारण

नगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राजकीय चर्चेने वेग पकडला आहे.

अहमदनगर, 4 जुलै : पारनेर नगरपंचायतीतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेच्या गटाला मोठा धक्का मानला जात असून इतरही काही नगरसेवक बंडखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्यांना रोखण्यात काही अंशी औटी गटाला यश आले आहे. मात्र भविष्यामध्ये हे नगरसेवक अन्य पर्यायाच्या शोधात आहेत. त्यामुळे माजी आ.विजय औटी यांना आपल्या बालेकिल्ल्यामध्ये पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी मोठे कसब पणाला लावावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार औटी यांना मात दिली होती. आता पाठोपाठच येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये सत्ता आपल्या ताब्यात घेण्याचा निलेश लंके यांनी निर्धार केलेला आहे. त्यामुळे लंके यांची भविष्यातील रणनीती काय आहे, यावरच नगरपंचायतीच्या सत्ता समीकरणाची गणितं अवलंबून असणार आहेत. अपक्ष 5, शिवसेना 9, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1 असं नगरपंचायतीत पक्षीय बलाबल आहे. त्यातील 4 शिवसेनेच्या व एका अपक्ष नगरसेवकांचा आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला. सध्या अपक्ष नगरसेवक वर्षा नगरे या आहेत नगराध्यक्षा आहेत. त्या विधानसभा निवडणुकीपासून माजी आ. औटी यांच्या गटात आहेत. पारनेर नगरपंचायतच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केल्यामुळे माजी आमदार विजय औटी यांना धक्का बसला असून आमदार निलेश लंके यांचे पारडे यामुळे जड झाले आहे. नगसेवकांनी का सोडली शिवसेना? राष्ट्रवादीत दाखल झालेल्या नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक नंदकुमार देशमुख,डॉ. मुद्दस्सीर सय्यद,किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने या नगरसेवकांचा समावेश आहे, तर शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख उमताई बोरुडे, उद्योजक सहदेव तराळ, शैलेश औटी, संतोष गंधाडे, राजेश चेडे आदींनी यावेळी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला.विधानसभा निवडणुकी पाठोपाठ नगरपंचायतीतील सत्ताबदल अपेक्षित होते. मात्र माजी आमदार विजय औटी यांनी नगराध्यक्ष वर्षा नगर यांना विधानसभेमध्ये केलेल्या मदतीमुळे संरक्षण दिले. त्यातच शिवसेनेचे काही नगरसेवक नाराज झाले. नगरपंचायत निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या निवडणुकीमध्ये आमदार निलेश लंके यांच्या गटाचे वर्चस्व राहण्याची शक्यता वाटू लागल्यामुळे  निवडणुकीमध्ये आपल्याला फायदा मिळावा म्हणून या नगरसेवकांनी थेट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तसेच नगरपंचायतमध्ये गेल्या साडे चार वर्षांमध्ये विकास कामांमध्ये अडवणूक केली गेल्याचा आरोप या नगरसेवकांनी माजी आ.औटी यांच्यावर केला आहे. यापुढे निलेश लंके यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट मत नगरसेवकांनी व्यक्त केले. आमदार निलेश लंके यांनी प्रवेश केलेल्या सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांना पक्षांमध्ये सन्मान दिला जाईल, अशी ग्वाही दिली. नगरसेवकांच्या प्रवेशामुळे आमदार निलेश लंके यांचे पारडे जड झाले आहे. आमदार निलेश लंके यांनी निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करण्याचे जाहीर आव्हान दिले असून ही निवडणूक 17-0 ने जिंकणार असल्याचा दावा या वेळी लंके यांनी केला आहे. संपादन - अक्षय शितोळे
First published:

Tags: NCP, Shivsena

पुढील बातम्या