जळगाव, 8 जुलै: पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेले भारतीय नागरिक आणि माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबाबत पाकिस्ताननं आणखी एक अजब दावा केला आहे. फाशीच्या शिक्षेविरोधात हायकोर्टात पुनर्विचार याचिका (रिव्ह्यू पिटीशन) दाखल करण्यास कुलभूषण जाधव यांचा नकार असल्याचं असं पाकिस्तान सरकारनं बुधवारी जाहीर केलं आहे. मात्र, लबाड पाकिस्तानची ही नवी खेळी असल्याचं मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा...कोरोनाबाबत मोठी बातमी! आता लक्षणविरहीत नागरिकांचीही होणार टेस्ट- आरोग्य मंत्री
उज्जव निकम यांनी सांगितलं की, पाकिस्तानची ही खेळी यशस्वी झाल्यास कुलभूषण जाधव हे 'भारताचा हेर' असल्याचं पाकिस्तानला कोर्टात सिद्ध करायचं आहे. पाकिस्तान अशा कुरापती करून कुलभूषण जाधव हे पाकिस्तानात हेरगिरी करण्यासाठी आले होते, हे सिद्ध करू शकते. त्यामुळे आता भारताला आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये (आयसीजे) पुन्हा दाद मागावी लागेल. आपल्याला कुलभूषण जाधव यांचे प्राण वाचवावे लागतील, असंही यावेळी उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.
काय आहे पाकिस्तानचा दावा...?
कुलभूषण जाधव हे 2016 पासून पाकिस्तानच्या तुरूंगात आहेत. कुलभूषण जाधव हे हेरगिरी करणारा असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. कुलभूषण जाधव यांना पुनर्विचार याचिका अर्थात रिव्ह्यू पिटीशन हायकोर्टात दाखल करायची नाही. फक्त त्यांना दया मागायची आहे, असं पाकिस्तान सरकारनं बुधवारी जाहीर केलं. मात्र, भारतानं पाकचा हा दावा फेटाळून लावला आहे.
हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकिस्तानी सुरक्षा दलांनी 3 मार्च 2016 रोजी बलुचिस्तानला कुलभूषण यांना अटक केली. सन 2017 मध्ये भारतानं या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) दाद मागितली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोर्टानं पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांना कॉन्सुलर प्रवेश (Consular Access)देण्याची आणि फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्यास सांगितलं.
पाकिस्तानची कायदेशीर यंत्रणा ही सैन्य शासित आणि सरकार शासित आहे आणि त्यांच्याकडे कोणत्याही कायदेशीर चौकटीचे किंवा आंतरराष्ट्रीय मापदंडांचे कोणतेही मूल्य नाही. त्यामुळे जाधव प्रकरणातील सर्व दरवाजे उघडे आहेत. पाकिस्तानचा कोणताही निर्णय किंवा आदेश हा आयसीजेच्या निदर्शनात आणला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा...खासदार अमोल कोल्हेंनी केली कोरोना टेस्ट, रिपोर्ट आल्यानंतर केलं महत्त्वाचं ट्वीट
दरम्यान, मध्यंतरी 3 मे रोजी कुलभूषण जाधव यांना परत आणण्यासाठी बॅक चॅनलवरून सरकारला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न झाला असल्याचा खुलासा ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी केला होता. या प्रकरणात साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) भारतीय समुपदेशक होते. ते भारताचे माजी सॉलिसिटर जनरल देखील आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या कोर्टानं एप्रिल 2017मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्ताननं त्यांच्यावर भारताचे हेरगिरी असल्याचा आरोप केला आहे.