प्रितम पंडित (सोलापूर), 16 डिसेंबर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरुषांबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ आज (दि.16) सोलापूर बंदची हाक दिली आहे. हा बंद श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्याकडून पुकारण्यात आला आहे. या बंदला सोलापुरातील व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिल्याने सगळीकडे शुकशुकाट पसरला आहे. पुणे बंदच्या अनुषंगाने व्यापारी दुपारी दोन वाजेपर्यंत बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहित समोर आली आहे.
दरम्यान अत्यावश्यक सेवा बंद काळात सुरू ठेवण्यात आल्याने कोणालाही याचा मोठा फटका बसणार याची खबरदारी घेण्यात आली आहे. सोलापूर बंदसाठी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली निघणार आहे. सोलापूर शहर पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त ठेवला आहे. रॅलीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे.
हे ही वाचा : कानडी सरकारच्या ड्रायव्हरचा खोटेपणा उघड, गाडीवर दगडफेकीबद्दल नवा खुलासा
छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून रॅली सुरू होणार आहे. सोलापूर शहरातील शिवप्रेमी संघटना सहभागी झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना यांना हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. राज्यातील थोर पुरुषांचा अपमान सहन केला जाणार नसल्याची भावना महिलांनी व्यक्त केली आहे.
सोलापूर बंदला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी, काँग्रेस यासह छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड, प्रहार संघटना यांच्यासह विविध व्यापारी संघटनाचा या बंदला पाठिंबा आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना, भाजप, मनसे या पक्षांचा या बंदला विरोध आहे.
हे ही वाचा : भाजप नेत्याच्या वाढदिवसाला कार्यकर्ते झाले बेभान, पोलिसांनी केला लाठीचार्ज तर स्टेशनवरच काढला मोर्चा
दोन्ही बाजूच्या संघटना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस उपायुक्त विजय कबाडे, दीपाले काळे यांनी बोलावून घेतले होते. त्यांच्याकडून बंदचे नियोजन जाणून घेण्यात आले. बंद यशस्वी करण्यासाठी किंवा बंदला विरोध करण्यासाठी कोणत्याही नागरिक आणि व्यापाऱ्यांना बळजबरी करण्यात येऊ नये, अशा पद्धतीच्या सूचना कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.