चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पंढरपूर, 7 मे : नऊ महिन्यांपूर्वी पंढरपूरचे उद्योजक अभिजीत पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू होत्या. अभिजीत पाटील यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये भाजप नेते प्रविण दरेकर यांची भेटही घेतली, यानंतर प्रविण दरेकर यांनी अभिजीत पाटील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे संकेतही दिले, पण याच अभिजीत पाटील यांनी 9 महिन्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये अभिजीत पाटील राष्ट्रवादीमध्ये आले. कोण आहेत अभिजीत पाटील? वाळू व्यावसायिक ते चार साखर कारखान्यांचा मालक, असा अभिजीत पाटील यांचा प्रवास आहे. अभिजीत पाटील यांनी आता विठ्ठल सहकारी कारखानाही ताब्यात घेतला आहे. कदाचित म्हणूनच शरद पवारांची बारीक नजर अभिजीत पाटील यांच्यावर पडली, यापुढे विठ्ठल परिवाराचं नेतृत्व करण्याची क्षमता अभिजीत मध्ये नक्कीच आहे, असं सर्टिफिकेट ही पवारांनी देऊन टाकलं. असं म्हणतात की पंढरपूरचा आमदार व्हायचं असेल तर विठ्ठल सहकारी कारखाना ताब्यात असावा लागतो, म्हणूनच अभिजीत पाटीलनी पहिलं काम तेच केलंय, पण त्याआधी ते एक वाळू व्यावसायिक होते, हेही विसरता येणार नाही, तुकाराम मुंढे हे सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना तर याच अभिजीत पाटील यांना तुरूगांतही जावं लागलं होतं, तरीही या युवकाने बाहेर येताच बंद पडलेले चार साखर कारखाने ताब्यात घेतले आणि यशस्वीपणे चालवले देखील, तिथूनच तो खऱ्या अर्थाने रोहित पवारांच्या नजरेत आले आणि अलगद पवारांच्या गुडबुक्समधे गेले, त्याच दरम्यान अभिजीत पाटील आयकर विभागाच्या रडारवर आले. त्यांच्या पाचही ऑफिसेसवर मध्यंतरी धाडी पडल्या होत्या, तरीही पवारांनी त्याला ताकद द्यायची ठरवलं. पंढरपुरात खरंतर पवारांनी भालकेंच्या मुलाला उमेदवारी देऊन पाहिली, पण भगिरथ भालके पराभूत झाले म्हणूनच पवारांनी तिथं आता अभिजीत पाटील या युवकाला पुढे आणून राष्ट्रवादीचा गड पुन्हा काबिज करण्याचे मनसुबे रचलेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.