पंढरपूर, 29 मे : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पंढरपूरच्या विकासासाठी 2700 कोटी रुपयांची घोषणा केली. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर पंढरपूरकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या नावाखाली कॉरिडॉरच राबवला जाणार का? अशी शंका आता व्यक्त होऊ लागलीय. पंढरपूरकरांच्या विरोधानंतर प्रशासनाने स्थानिक रहिवाशांना त्यांचा आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते. सध्या सरकारकडे स्थानिकांचा विकास आराखडा आणि प्रशासनाचे तीन आराखडे प्रस्तावित आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेले 2700 कोटी रुपयांमधून नक्की कोणता विकास आराखडा राबवला जाणार आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. स्थानिक प्रशासनाकडे देखील याची माहिती नाही. त्यामुळे यामध्ये संभ्रम अधिक वाढला आहे. वाचा - Political News : काँग्रेस भाकरी फिरवणार! नाना पटोलेंचं पद जाणार? प्रदेशाध्यक्षपदी ही नावं चर्चेत दरम्यान, पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना सर्व सुख-सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याला पंढरपूरकरांचा देखील विरोध नाही. मात्र, भाविकांना सुख सुविधा देण्याच्या प्रयत्नात पंढरपूरकर उद्ध्वस्त होऊ नये, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. मागील आठ ते दहा महिन्यापासून पंढरपूरमध्ये कॉरिडॉरचा विषय गाजतोय. मंदिर परिसरात 200 मीटरमध्ये कॉरिडोर राबवणार जाणार असल्याचे सांगितले जात होते. यामध्ये शेकडो राहती घरे दुकाने उद्ध्वस्त होणार होती. आपल्या घरावरच बुलडोझर फिरणार या भीतीने मंदिर परिसरातील रहिवाशांनी आणि व्यावसायिकांनी या प्रस्तावित कॉरिडॉरला विरोध केला. पंढरपूरकरांच्या या विरोधानंतर सरकारने स्थानिकांना विकासात घेऊन विकास कामे करू असे जाहीर केले. त्यानंतर हा विषय मागे पडला होता. मात्र, अचानक उपमुख्यमंत्र्यांनी इतक्या मोठ्या निधीची घोषणा केल्याने पंढरपूरकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.