अनुराग सुतकर, प्रतिनिधी
सोलापूर, 24 मार्च : ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या अनेक मुली आजही 3 ते 6 किलोमीटर अंतरावरून शाळेला येतात. मात्र, अनेक मुलींना शाळा गावापासून दूर आहे. चालत जाणे शक्य नाही म्हणून पालक शाळेत पाठवत नाहीत. त्यामुळे दूर वरून येणाऱ्या या मुलींच्या शिक्षणामध्ये पुढील अडचणी निर्माण होतात. अशा मुलींना सायकलमुळे दररोज शाळेत येणे शक्य होईल म्हणून सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, निमगाव (म) या शाळेमध्ये 'सायकल बँक' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कोणी सुरु केला उपक्रम?
शिक्षक सुहास जयराम उरवणे यानी जिल्हा परिषद शाळा, निमगाव (म) या शाळेमध्ये शेकडो मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ' सायकल बँक ' हा उपक्रम सुरु केला आहे. त्यांच्या या उपक्रमासाठी त्यांना सर फाऊंडेशनचा उत्क्रुष्ट टिचर इन्होव्हेशनचा पुरस्कार मिळाला आहे. याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसला आणि बघता बघता हा उपक्रम जिल्ह्याच्या अस्मितेचा राज्याच्या पटलावर पोहचलेला उपक्रम ठरला आहे.
मनोरंजनातून विद्यार्थ्यांना शिकवला मोठा धडा, शिक्षकाच्या कामाचा देशपातळीवर सन्मान, Video
अनेक फायदे
संपूर्ण महाराष्ट्रासाठी पायलट प्रोजेक्ट ठरलेल्या या उपक्रमाचे आमच्या कल्पनेपेक्षा ही अधिक फायदे दिसून आले. आज संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये 4 हजारहून अधिक सायकलींची 'सायकल बँक' तयार झाली आहे. शाळा पातळीवर ही याचे अनेक फायदे दिसून आले, असं शिक्षक सुहास उरवणे यांनी सांगितले.
काय झाले फायदे?
-शाळेचा पट 248 वरून 360 वर पोहचला म्हणजे 112 ने वाढला आहे.
-3 ते 6 किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या मुलींच्या प्रवासाची व्यवस्था झाली.
-पालकांचा शाळेबद्दलचा आणि शिक्षकांबद्दलचा आदर वाढला.
-पालकांच्या मनामध्ये मुलींच्या शिक्षणाबद्दल जन जागृती निर्माण झाली.
-मुलींना शाळेत येण्यासाठी लागणारा प्रवासाचा वेळ कमी झाला. मुलींना प्रवासाबद्दल सुरक्षिततेची जाणीव झाली .
-मुलींच्या वाचलेल्या वेळेचा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपयोग झाला.
Solapur News: सापशिडीतून शिकवलं गणित, कल्पक शिक्षकाला मिळाला मोठा पुरस्कार! Video
काय आहे संकल्पना?
'मुलींचे शिक्षण देशाचे रक्षण' हे घोषवाक्य शोभून दिसत असतानाच माळशिरस तालुक्यातील निमगाव (म) गावांमध्ये असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शेतमजुरांच्या अनेक मुली शिक्षण घेण्यासाठी 3 ते 6 किलोमीटर अंतरावरुन येतात. परंतु येण्याजाण्याच्या सुविधांअभावी या मुलींचे शिक्षण थांबू पाहत होते. अशा वेळी या मुलींची शाळेत येण्याची सोय व्हावी म्हणून 'सायकल बँक' ही संकल्पना पुढे आली.
देणगीदारांचा प्रतिसाद
आमच्या शाळेतील 5 वी ते 8 वीच्या मुलींसाठी 51 सायकली सहभागातून उपलब्ध करण्याचा संकल्प आम्ही सर्व शिक्षकांनी केला. 'संकल्प गुरुजनांचा सायकल बँक उभारण्याचा' हे घोषवाक्य घेऊन आम्ही कामास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात अगदी 5 ते 10 सायकली जमा होतील असे वाटत असतानाच देणगीदारांचा आम्हाला इतका प्रतिसाद मिळत गेला जणूकाही 'सायकल बँक' हे त्यांचेच स्वप्न आहे. प्रत्येक दात्याचा फेटा बांधून होणारा सन्मान समाज माध्यमांमध्ये दिलेली प्रसिध्दी दात्यांचा केलेला व्हॉट्सअॅप ग्रुप यामुळे बघता बघता दोनच महिन्यात 36 सायकली आमच्या सायकल बँकेत जमा झाल्या, असंही सुहास उरवणे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.