अनुराग सुतकर, प्रतिनिधी
सोलापूर, 6 मार्च: सध्याच्या डिजिटलच्या युगात सर्वच शिक्षण प्रणाली ही डिजिटल होत आहे. परंतु देशात अजूनही खेडोपाडी मोबाईल सुविधा ही संपूर्णपणे पोहोचली नाही. त्यामुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीचा वापर करत आकर्षणातून शिक्षणाकडे हा उपक्रम सोलापुरातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका निलिमा जाधव यांनी अत्यंत उत्तमरीत्या राबवला आहे. त्यांच्या या उपक्रमाला सर फाउंडेशनचा उत्तम उपक्रम म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
सापशिडीच्या खेळातून गणिताचे शिक्षण
लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना गणित हा विषय अवघड वाटू लागतो. त्यावर त्यांनी उपाययोजना म्हणून सापशिडीच्या खेळातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणित विषय अत्यंत उत्तमरित्या शिकवला आहे. त्याचप्रमाणे कल्पवृक्ष ही संकल्पना गणिताच्या माध्यमातून अगदी उत्तमरित्या राबवली आहे. त्यांच्या या संकल्पनेमुळे संगणक युगातील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या साधनाचा वापर कसा करावा तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड दूर करून संख्याज्ञान आणि पाढे पाठांतर कसे करून घ्यावे, याचे प्रत्यक्षात ज्ञान मिळत आहे.
विद्यार्थ्यांना आता गणित विषय वाटतो सोपा
गणिताच्या अध्यापनामुळे तर्कशक्ती, स्मरणशक्ती आणि सुसंगत विचार करण्याची क्षमता विद्यार्थ्यांची वाढली आहे. विद्यार्थ्यांत स्वयं अध्ययन आणि अभ्यासाच्या नवीन पद्धतींचा विकास झाला आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या जीवनात असणारे शैक्षणिक महत्त्व सुद्धा यामुळे पटवून देण्यात आले आहे. शिवाय पूर्वी जे विद्यार्थी गणित म्हणलं की चार हात लांब राहत होते तेच विद्यार्थी आज नीलिमा यांना आम्हाला गणित विषय किती सोपा वाटत आहे हे पटवून देतात. शिवाय सापशिडी सारख्या बैठे खेळातून विद्यार्थ्यांना सांख्यिकी ज्ञान व्यवस्थित मिळत आहे.
राज्यातील दिग्गजांचा होणार 'सर फाऊंडेशन'कडून सन्मान, पाहा कोण आहेत लाभार्थी!
शिक्षण प्रणाली खेडोपाडी पोहचवण्याचा हेतू
लहानपणापासून विद्यार्थ्यांना गणित हा विषय अवघड वाटू लागतो. त्यावरच एक ठोस उपाययोजना करावी या हेतूने ही संकल्पना मी जिल्हा परिषद शाळेत राबवली आहे. त्याचा शंभर टक्के निकाल आम्हाला मिळाला असून विद्यार्थी आज आकडेमोड आणि बेरीज वजाबाकी या गोष्टी सहज करू शकतात. येत्या काळात आणखी नव्या उपक्रमातून खेडोपाडी शिक्षण प्रणाली पोहोचवावी हाच हेतू आमच्या मनात आहे, असे अक्कलकोटमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका निलिमा जाधव सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Education, Local18, Solapur, Solapur news