सोलापूर, 21 डिसेंबर : मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला. मात्र आता यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे. अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टींवर गंभीर आरोप केला आहे. भाजपचे आमदार सरपंचांना फोन करून नीधी न देण्याची भीती दाखवत आहेत, तसेच त्यांना पाठिंबा देण्याबाबत बोलत असल्याचं सिद्धाराम म्हेत्रे यांनी म्हटलं आहे. सिद्धाराम म्हेत्रे यांच्या आरोंपामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हटलं म्हेत्रे यांनी?
काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे आमदार निवडून आलेल्या सरपंचांना फोन करून निधी न देण्याची भीती दाखवत आहेत. अक्कलकोट तालुक्यातील 20 पैकी 11 ग्रामपंचायंतीमध्ये आमची सत्ता आली. मात्र सत्तेतील लोक निवडून आलेल्या सरपंचांना फोन करून त्यांना पाठिंबा न दिल्यास निधी देणार नाही अशी भीती दाखवत आहेत. तसेच ते निवडून आलेल्या सरपंचांना म्हेत्रे यांना पाठिंबा देऊ नका असं देखील सांगत असल्याचा आरोप सिद्धाराम म्हेत्रे यांनी केला आहे.
'सरपंचांचा पाठिंबा देण्यास नकार '
पुढे बोलताना म्हेत्रे यांनी म्हटलं की, आमच्या सरपंचांना फोन येत आहेत. मात्र त्यांनी तिकडे जाण्यास नकार दिला आहे. त्यांनी भाजपला सांगितलं आहे की, आम्हाला पुढील दीड वर्ष निधी मिळाला नाही तरी चालेल, नंतर आमचीच सत्ता येणार आहे. जनतेने आम्हाला संधी दिली आहे, या संधीचं सोनं करून आम्ही गावचा विकास करू असा दावाही यावेळी म्हेत्रे यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.