सोलापूर, 16 मार्च : सोलापूर महानगरपालिकेच्या (Solapur Municipal Corporation) स्थायी समितीच्या (Standing Committee) अध्यपदावरून आणखी नवा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आलेल्या सर्व सभासदांचेच निलंबन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार हे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे मागील तीन वर्षापासून रखडलेल्या या समितीचे भवितव्य पुन्हा लांबणीला पडले आहे.
5 मार्च रोजी होणाऱ्या स्थायी आणि परिवहन समितीच्या निवडणुकीला एमआयएमच्या गटनेतेपदाच्या वादामुळे शासनाने स्थगिती दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर 15 मार्च रोजी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आणि शासनाने स्थायी समितीतील सर्वच सदस्यांचे निलंबन केले आहे. त्यामुळे स्थायी आणि परिवहन समितीच्या सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया रद्द झाली आहे.
मेव्हणीने KBC मध्ये जिंकले 50 लाख, पैशांच्या लालसेपोटी पत्नीला दिला तीन तलाक
काही दिवसांपूर्वी सोलापूर महानगरपालिकेतील स्थायी आणि परिवहन समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्या दोन्ही समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणून होणार होती. मात्र, एमआयएमच्या गटनेतेपदाच्या वादामुळे मागीलवेळी निवडणूक स्थगित झाली होती. त्यानंतर मात्र अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आलेल्या सदस्यांचेच निलंबन शासनाने केले आहे. हे निलंबन करताना शासनाने सांगितले की, 'दोन्ही समितीतील सदस्यांच्या निवडी या महापालिका अधिनियम 1949 च्या कलम 31-अ च्या तरतुदींशी विसंगत आहे. त्यामुळे महापालिकेचा ठराव रद्द करण्यात येत असल्याचे राज्यशासनाने आपल्या आदेशात सांगितले आहे. मात्र, असं असलं तरी ज्या सदस्यांना या निर्णयाबाबत काही हरकती असल्यास त्यांनी आपल्या हरकती 30 दिवसांपर्यंत नोंदवू शकत असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.
तीन वर्षापासून स्थायी समितीचे अध्यक्षपद रिकामेच!
2016 साली सोलापूर महानगरपालिकेत भाजपची पहिल्यांदाच एकहाती सत्ता आली होती. त्यावेळी सुरूवातीचे दोन वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद भाजपकडे राहिले. मात्र त्यानंतर अद्यापर्यंत स्थायी समितीचे अध्यक्षपद रिकामेच राहिले आहे. या उलट मागीलवेळी म्हणजे 2018 साली झालेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक भाजपच्या दोन देशमुखांच्या गटातटामुळे शिवसेनेकडे जाण्याची वेळ आली होती. मात्र ऐनवेळी आमदार विजयकुमार देशमुखांच्या गटातील एका कार्यकर्त्यांने आमदार सुभाष देशमुख गटाच्या उमेदवाराचा अर्जच पळवून नेल्याने त्यावेळची निवडणूक स्थगित झाली. त्यानंतर मात्र तीन वर्षानंतर म्हणजेच 5 मार्च 2021 रोजी निवडणूक लागली होती. त्यातही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना पहायला मिळाला आणि त्यातच ही निवडणूक रद्द करण्यात आली.
Sachin Vaze अटक प्रकरणाला नवे वळण, फक्त वाझेंच्या घराचे फुटेज का केले गायब?
यापुर्वी स्थायी समितीचा वाद हायकोर्टात गेल्यानंतर यंदाच्या वर्षी निवडणूक घेण्यास कोर्टाने परवानगी दिली. त्यानुसार, 20 फेब्रुवारी रोजी स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. त्यानुसार निवडीही झाल्या मात्र स्थायी समितीतील एमआयएमचे गटनेते कोण असा नवा वाद निर्माण झाला. तो गटनेतेपदाचा वादही कोर्टात गेला आणि निवडणूक प्रक्रिया पुन्हा एकदा थांबली. त्यामुळे एकंदरीतच सोलापूर महानगरपालिकेतील कारभार आता कोर्टाच्या भरवश्यावर चालला असल्याचे पहायला मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Mumbai, Solapur