नवी मुंबई, 13 मार्च : नवी मुंबई शहरात सुरू असलेल्या दहा शाळांनी महापालिकेची मान्यता घेतलेली नाही. त्यामुळे या शाळांना अनधिकृत घोषित (Illegal schools in Navi Mumbai) करण्यात आलं आहे. शहरातील कोणतीही शाळा महापालिकेच्या मान्यतेशिवाय चालविता येत नसल्याने या दहा अनधिकृत शाळेत पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये. घेतला असेल तर तो रद्द करावा, असा सावधगिरीचा इशारा नवी मुंबई महापालिकेने पालकांना दिला आहे. तसंच मान्यतेशिवाय सुरू असलेल्या या शाळा तातडीने बंद कराव्यात, अशी तंबीही संबंधीत संस्थांना दिली आहे. आरटीई अधिनियमांतर्गत शाळा चालविण्यासाठी संबंधित शिक्षण संस्थेला महापालिकेच्या मान्यतेची आवश्यकता असते. मात्र नवी मुंबईमधील इंग्रजी माध्यमाच्या दहा शाळांनी महापालिकेची कोणतीही मान्यता घेतलेली नाही. चौकशीमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिका प्रशासनाने या अनधिकृत म्हणून जाहीर केल्या आहेत. हेही वाचा - ‘एकवेळ पिझ्झा आणि अननस चालेल पण..’ मुंबई पोलिसांची पोस्ट व्हायरल या शाळांमध्ये कोणत्याही पालकांनी आपल्या पाल्यांना पाठवू नये. जर या शाळांमध्ये मुलांचे शिक्षण सुरू असले तर तातडीने थांबवावे आणि मुलांना त्याच परिसरातील दुसऱ्या शाळांमध्ये पाठवावे, असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पालकांना केलं आहे. अनधिकृत शाळांची यादी 1) अल मोमिना स्कूल, सेक्टर 8, र्आिटस व्हिलेज, सीबीडी बेलापूर, 2) इकरा इंटरनॅशनल स्कूल, सेक्टर-27, नेरूळ, 3) द ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, सीवूड, सेक्टर-40, नेरूळ, 4) नवी मुंबई ख्रिश्चन इंग्लिश स्कूल, तुर्भे स्टोअर्स, 5) रोज बर्ड्स स्कूल, तुर्भे स्टोअर्स, 6) सरस्वती विद्यानिकेतन स्कूल, सेक्टर-5, घणसोली, 7) अचिव्हर्स वल्र्ड प्रायमरी स्कूल, सेक्टर-1, घणसोली, 8) इम्पाईसीस इंग्रजी स्कूल, सेक्टर-2, घणसोली, 9) ब्लोसोम स्कूल, घणसोली गाव, 10) इलिम इंग्लिश स्कूल, आंबेडकरनगर, रबाळे. …तर आम्ही जबाबदार नाही! ‘महापालिकेने या दहा शाळा अनधिकृत म्हणून जाहीर केल्या आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये कोणत्याही पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये. जर अनधिकृत शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश राहिला तर ते शिक्षण गृहित धरले जाणार नाही. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले तर त्याला महापालिका जबाबदार राहणार नाही,’ असं प्रशासनाने नमूद केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.