मुंबई, 23 जानेवारी : शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत घोषणा केली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी वंचित महाविकासआघाडीचा भाग असेल, असं स्पष्ट केलं. पण वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकासआघाडीत अडचणी निर्माण झाल्या आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याला कारण ठरलंय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेल्या प्रतिक्रिया.
शिवसेना-वंचितच्या युतीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक विधान केलं आहे. 'उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीला शुभेच्छा. उद्धव ठाकरे आणि माझं आज फोनवर बोलणं झालं. त्यांना मी सांगितलं प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव काय आहे हे आधी कळू द्या. मग काँग्रेस आपला प्रस्ताव देईल,' अशी अट नाना पटोले यांनी ठेवली आहे. आजची पत्रकार परिषद महाविकासआघाडीची नव्हती, अद्याप त्यांच्याकडून प्रस्ताव आलेला नाही, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.
दुसरीकडे शिवसेना-वंचित युतीवरून अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरही उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. महाविकासआघाडी होत असेल तर जागावाटपामध्ये वंचितला शिवसेनेच्या कोट्यातून जागा देण्यात याव्यात, असं अजित पवार म्हणाले होते. अजित पवारांच्या याच वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी फटकारलं आहे.
'प्रकाश आंबेडकर यांना महाविकासआघाडीमध्ये स्थान असणार. कुणी कुठल्या जागा लढवायच्या हे ठरवण्याची वेळ आता आली आहे. कुणाला कोणत्या जागा हे ठरल्यानंतर मग मित्रपक्षांना कोणत्या जागा द्यायच्या हे ठरवता येईल,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
'विधानपरिषदेमध्ये आम्ही एकमेकांना मदत केली. नागपूरमध्ये आम्ही अर्ज भरला होता, पण मागे घेतला. नाशिकची जागा काँग्रेसला सोडली होती, पण काँग्रेस उमेदवाराने करायला नको ते केलं. त्यानंतर आम्ही महाविकासआघाडीने अपक्ष शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. अमरावतीची जागा काँग्रेसने जिंकली नव्हती ती आम्ही काँग्रेसला सोडली, पण काँग्रेसने आमचा माणूस उमेदवार केला, आम्ही त्याला काही म्हणलं नाही. त्यामुळे सामंजस्याचं राजकारण करायचं नसेल, तर मग एकत्र येण्याचं नाटक कुणीही करू नये,' असा टोला उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Nana Patole, Prakash ambedkar, Shivsena, Uddhav Thackeray