मुंबई, 28 ऑगस्ट : शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यामुळे आता शिवतीर्थावर दसरा मेळावा (shivsena dasara melava) कोण घेणार अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेला अद्याप शिवतीर्थावर परवानगी मिळालेली नाही. तर दुसरीकडे, आम्ही हिंदुत्ववादी विचारांचे आहोत त्यामुळे दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आमचा आहे, या संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असं सूच विधान, शिंदे गटाचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केलं आहे. शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे गट पडल्यानंतर यंदाचा शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा यंदा कोण करणार? आणि कुणाला अधिकृत परवानगी मिळणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यंदा शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सकारात्मक संकेत दिले आहे. हिंदुत्ववादी विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसैनिक जमत आले आहे. आता आम्ही हिंदुत्ववादी विचारांचे आहोत. जे हिंदुत्वावादी विचारांवर अधिकार सांगत आहे, त्यांनी विचार सोडले आहे. त्यामुळे त्यांना मेळावा घेण्याचा कोणता अधिकार आहे? हा मेळावा घेण्याचा आमचा अधिकार आहे. त्यामुळे दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आमचा आहे या संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असं म्हस्के यांनी ठणकावून सांगितलं आहे. ( मुख्यमंत्री शिंदे म्हणतात खऱ्या अर्थाने पायरीवर कोणी आणले, हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले) त्यामुळे आता मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानात यंदाचा दसरा मेळावा ठाकरे गट आयोजित करणार की शिंदे गट आयोजित करणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे. दसरा मेळावा घेण्याची अधिकृत परवानगी कुणाला मिळणार? याचा वाद आता पुन्हा वाढत जाणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरणरही तापणार आहे. दरम्यान, दसरा मेळावा घेण्यावरून शिंदे गटामध्ये दोन मतप्रवाह पाहण्यास मिळत आहे. ‘शिवतीर्थावर गेल्या 55 ते 60 वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून प्रखरपणे हिंदुत्वाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या विचार ऐकण्यासाठी आमच्यासारखे शिवसैनिक आतुर राहत होते. त्यामुळे आमच्या सारख्या शिवसैनिकांची इच्छा आहे की, जो हिंदुत्वाचे प्रखर विचार देईल, त्याची आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही शिवसेना म्हणून दसऱ्या मेळाव्यासाठी आमच्याकडून परवानगी मागितली नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आणि दादरचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी सांगितलं होतं. त्यातच आता म्हस्के यांनी थेट टोकाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







