सातारा, 28 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते मागच्या दोन दिवसांपासून सातारा दौऱ्यावर आहेत त्यांना सातारा जिल्ह्यासाठी मास्टर प्लॅन केल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते सातारा दौऱ्यावर असताना पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्र कोकणाला जोडण्यासंदर्भात आम्ही अभूतपूर्व निर्णय घेत आहोत. त्यासाठी कोयनेच्या बॅक वॉटरमध्ये दोन पुलांसाठी 450 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहे. असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सातारा जिल्ह्याचा अभूतपूर्व विकास करून दाखवल्याशिवाय हा एकनाथ शिंदे गप्प बसणार नाही, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले यांनी पत्रकार परिषदेत सातारा जिल्ह्याविषयीचा मास्टर प्लॅन सादर केला. दरम्यान, सत्ताधारी दोन दिवसांत पायऱ्यांवर आले, असे म्हणणाऱ्यांना खऱ्या अर्थाने पायरीवर कोणी आणले, हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहे, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला.
हे ही वाचा : सोनाली फोगाट हत्या प्रकरण CBI कडे जाणार? गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी महाबळेश्वरमध्ये आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलिसप्रमुख अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्ह्याची महत्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर भरगच्च पत्रकार परिषदेत ना. एकनाथ शिंदे बोलत होते. ना. शिंदे म्हणाले, खूप महत्वाचे ऐतिहासिक निर्णय आजच्या बैठकीत घेतले आहेत. सातारा जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी वाव आहे. त्यादृष्टीने काम करावे लागणार आहे. या भागातील लोकांना काही काही माध्यमातून रोजगार वाढवायचा आहे. तसेच मुलभूत सुविधाही वाढवायच्या आहेत.
महाबळेश्वर येथे बारमाही पर्यटन असून जेणेकरून महाबळेश्वरला जे पर्यटक येतात त्यांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी, रस्ते यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करणे गरजेचे आहे. त्या संदर्भात आढावा बैठक घेतली असून संबंधित अधिकारी व सचिवांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
महाबळेश्वर मुख्याधिकाऱ्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्यांना तातडीने मान्यता दिली असून त्यासाठीची निधीची उपलब्धता तातडीने करून दिली जाईल. प्रतापगडसह सातारा जिल्ह्यातील गडकिल्ल्यांच्या विकासाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या असून त्यासाठी भरीव निधी दिला जाईल. दुर्गम भागतील जनतेसाठी तातडीने बार्ज ( तराफा ) ची व्यवस्था करण्यासाठी अडीच कोटींचा निधी वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मिनी बसेसची व्यवस्था करून दिली जाईल. महाबळेश्वरात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभे केले जाणार आहे. हे गोर गरिबांचे सरकार असल्यामुळे थांबा, वाट पहा असे काही होणार नाही.
हे ही वाचा : Thane Gang Rape Case : मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था वेशीला टांगली अल्पवयीन मुलीवर गँगरेप
जागच्या जागी निर्णय होतील, असेही त्यांनी सांगितले. कास-बामणोली रस्त्यासाठी सीआरएफमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल. कास परिसरातील बांधकामांना नोटीसा दिल्या गेल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, प्रत्येकाच्या रोजी-रोटीचा प्रश्न आहे. कुणाचीही रोजी-रोटी हिरावून घेतली जाणार नाही. जर काही चुकीचे घडले असेल तर तपासून घेतले जाईल. महाबळेश्वर व पाचगणी परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत विचारले असता ना. शिंदे म्हणाले, सर्व बाबी तपासून घेतल्या जातील. मात्र, तातडीने कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm eknath shinde, Satara (City/Town/Village), Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)