मुंबई, 23 जुलै : मागच्या दोन दिवसांपूर्वी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून तळागाळातून आलेल्या महिला द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली. मुर्मू यांनी विरोधी यशवंत सिन्हा यांचा मोठ्या फरकाने पराभव केल्याने विरोधकांमध्ये ही एकजूट दिसून आली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यामुळे देशातील आगामी काळातील निवडणुकांवर भाजप आणि घटकपक्षांची पकड मजबूत होणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान सामना अग्रलेखांतून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आवाहन करण्यात आले आहे. देश आज कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करत असताना निःपक्ष व बाणेदार राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा लौकिक व्हावा हीच सदिच्छा! व्यक्त केली आहे. (shiv sena saamana Editorial)
सामनातून अग्रलेखातून मुर्मू यांना आवाहन करण्यात आले आहे कि, अलीकडच्या काळात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदास मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. देशातील अनेक स्वायत्त संस्था सरकारच्या बटीक असल्याप्रमाणे वागत असताना तळागाळातून राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचलेल्या द्रौपदी मुर्मू या सर्वोच्च सिंहासनाची बूज कशी राखतात हे पाहणे कुतूहलाचे असणार आहे. तूर्तास, मुर्मू यांचे अभिनंदन! देश आज कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करत असताना निःपक्ष व बाणेदार राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा लौकिक व्हावा हीच सदिच्छा! व्यक्त केली आहे.
हे ही वाचा : पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया
देशाच्या प्रथम नागरिक तथा पंधराव्या राष्ट्रपती म्हणून अपेक्षेप्रमाणे द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. अर्थात, भाजपच्या पाठीशी असलेले मोठे संख्याबळ आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच विरोधी पक्षांत नसलेली एकवाक्यता यामुळे या निवडणुकीचा निकाल काय असणार हे मतदानापूर्वीच जगजाहीर झाले होते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्म झालेल्या आणि आजवरच्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती होण्याचा मान द्रौपदी मुर्मू यांनी मिळवला आहे. ओडिशाच्या संथाल आदिवासी समाजात जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने देशभरातील आदिवासी समुदायाला आनंद होणे स्वाभाविक आहे. उपरबेडा हे खेडेगाव ते राजधानीतील राष्ट्रपती भवन हे सुमारे दोन हजार किलोमीटरचे अंतर पार करणे तसे सोपे नव्हते. प्रारंभी काळात सिंचन विभागात कारकुनाची नोकरी व नंतर शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
हे ही वाचा : खरी शिवसेना कोणाची? आता निवडणूक आयोग करणार फैसला, दोन्ही गटांना महत्त्वाचे आदेश
भाजपच्या शिडीवर ठेवलेले हे पहिले पाऊलच त्यांना आज राष्ट्रपती भवनाच्या शिखरापर्यंत घेऊन गेले. 1997 साली नगरसेवक, 2000 साली आमदार व बिजू जनता दल-भाजप सरकारमध्ये मंत्री, 2015 मध्ये झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती आणि आता थेट राष्ट्रपती, असा हा मुर्मू यांचा साराच प्रवास विस्मयकारक म्हणावा लागेल. संथाली आणि उडिया भाषेतील उत्कृष्ट वक्त्या असलेल्या द्रौपदी मुर्मू यांची प्रजापिता ब्रह्माकुमारींच्या आध्यात्मिक विचारधारेशी जवळीक आहे. 2009 ते 2015 हा सहा वर्षांचा काळ मुर्मू यांच्या व्यक्तिगत आयुष्यात वेदनादायी ठरला. दोन मुलांचा लागोपाठ मृत्यू आणि त्यानंतर पतीचे निधन यामुळे काहीशा खचलेल्या मुर्मू यांनी ब्रह्माकुमारींच्या ध्यान पद्धतीचा अवलंब करून या दुःखावर मात केली, असे सांगितले जाते.