मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसेनेला आणखी एक झटका, उद्धव ठाकरेंचा जवळचा नेता एसीबीच्या रडारवर

शिवसेनेला आणखी एक झटका, उद्धव ठाकरेंचा जवळचा नेता एसीबीच्या रडारवर

उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी आणखी एक नेता आर्थिक व्यवहाराप्रकरणी अडचणीत सापडला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sindhudurg, India
  • Published by:  Chetan Patil

सिंधुदुर्ग, 7 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा काहीच भरोसा नाही. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पक्षांपैकी एक पक्ष असलेल्या शिवसेनेत मोठी फूट पडेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण तशा घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे त्यानंतरही शिवसेनेच्या विरोधातच घटना घडत आहेत. शिवसेनेच्या चिन्हाच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणावर लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण या निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीच्या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच गट पुढे असल्याचं चित्र आहे. कारण शिंदे गटाने आज निवडणूक आयोगाकडे जवळपास सात लाख सदस्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती समोर आली आहे. तर ठाकरे गटाने अडीच लाख सदस्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. शिवसेनेने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आणखी तीन आठवड्यांची मुदतवाढ मागितली. पण ती मागणी फेटाळत निवडणूक आयोगाने उद्या दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ दिला. निवडणूक आयोगात ही लढाई सुरु असताना शिवसेनेला झटका देणारी आणखी घटना समोर आली आहे. ती म्हणजे शिवसेनेचे नेते वैभव नाईक एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आले आहेत. एसीबीने त्यांची चौकशी केल्याचं समोर आलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी आणखी एक नेता आर्थिक व्यवहाराप्रकरणी अडचणीत सापडला आहे. याआधी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत अडचणीत आले आहेत. त्यानंतर आता शिवसेनेचे सिंधुदुर्गातील आमदार वैभव नाईक आर्थिक व्यवहारांप्रकरणी अडचणीत सापडले आहेत. वैभव नाईक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आहेत. लाचलुचपत विभागाने आज त्यांची शासकीय विश्रामगृह येथे जवळपास अर्धा तास चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

(शिवसेनेला आता फक्त पुढच्या 21 तासांची मुदत, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिल्लीत प्रचंड घडामोडी)

आमदार वैभव नाईक हे कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार आहेत. शिवसेनेच्या कठीण काळात ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिले. ते उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते आहेत, असं मानलं जातं. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील तणाव जास्त वाढला आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक आयोगात लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे. या दरम्यान वैभव नाईक लाचलुचपत प्रतिबंधत विभागाच्या रडारवर सापडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे.

रत्नागिरीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाने आज वैभव नाईक यांची चौकशी केली. या पथकाने वैभव नाईक यांच्या गेल्या 20 वर्षातील उत्पन्नाचा हिशोब मागितला आहे. एसीबीने वैभव नाईकांकडून त्यांच्या 2002 ते 2020 पर्यंतच्या उत्तपन्नाचा हिशोब मागितला आहे. त्यासाठी या पथकाने वैभव नाईक यांना आठ दिवसांचा वेळ दिला आहे. एसीबीने याबाबत वैभव नाईकांना पत्र दिलं आहे. त्या पत्रात एसीबीने वैभव नाईकांना 12 ऑक्टोबरला रत्नागिरीच्या लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

First published:

Tags: Maharashtra politics, Shiv sena