मुंबई, 10 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते, महाराष्ट्र सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री संजय राठोड यांनी अखेर त्यांच्यावरील गंभीर आरोपांवर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपांमुळे राठोडांना मंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. पण गेल्या दीड वर्षात पोलिसांच्या झालेल्या तपासात त्यांना क्लीन चीट मिळाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केला होता. संजय राठोडांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना विरोध केला होता. तसेच विविध स्तरावरुन त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. अखेर या टीकेवर संजय राठोड यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. यावेळी राठोड यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आपल्यावर अशाप्रकारे आरोप यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. एवढ्या दिवसांपासून आम्ही गप्प होतो. पण यापुढे कायदेशीर पाऊल उचललं जाईल, असे संकेत राठोडांनी दिले.
"मी भटक्या, विमुक्त आणि मागासवर्ग समाजातून येतो. मी चारवेळा विधानसभेतून मोठ्या मताने निवडून येतो तेव्हा मला मंत्रीपदाची शपथ मिळाली. मागच्या सरकारमध्येही मी मंत्री होतो. पण एक घटना घडली त्यावरुन माझ्यावर गंभीर आरोप झाले. ती घटना झाल्यानंतर नैतिक जबाबदारी समजून मी आरोपांची नि:पक्ष चौकशी झाली पाहिजे, ही भूमिका घेवून मी स्वत: राजीनामा दिला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करुन मला क्लीन चीट दिली. पोलिसांनी सर्व बाबी मांडल्या आहेत", अशी भूमिका संजय राठोडांनी मांडली.
(भाजपचं 'ऑपरेशन' सुरू असताना उद्धव ठाकरे बेसावध राहिले? पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काय?)
"गेल्या 15 महिने मी आणि माझं कुटुंब मानसिक तणावात होतं. अशा प्रसंगामधून खरंतर कुणीही जावू नये. कारण या प्रसंगातून मी गेलो आहे. मी गेल्या 30 वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक जीवनात आहे. माझं राजकीय कारकिर्द संपवण्याचा प्रयत्न झाला", असं राठोड म्हणाले.
"पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. मी निष्कलंक आहे. संबंधित प्रकरणात माझा काही हस्तक्षेप होता असं काही समोर आलेलं नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी मला परत संधी दिली आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
"लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. कदाचित चित्रा वाघ यांना माहिती असेल. आम्ही सर्व कागदपत्रे त्यांना पाठवण्याची व्यवस्था केली आहे. पोलिसांनी सर्व तपास केला आहे. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे मी आतापर्यंत शांत होतो. आता सर्व सत्य बाहेर आलं आहे. म्हणून मी आता शांत बसणार नाही. मी सर्व भोगलं आहे. माझं परिवार, कार्यकर्ते आहेत. माझ्यावर असेच आरोप झाले तर मी कायदेशीर पावलं उचलेल. कायदेशीर नोटीस देईन", असं विधान संजय राठोडांनी केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chitra wagh, Sanjay rathod, Shiv sena