ठाणे, 9 ऑक्टोबर : शिवसेनेकडून आता प्रबोधन यात्रा सुरु करण्यात आली आहे. ही यात्रा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून सुरु झालीय. या यात्रेदरम्यान आयोजित कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी सुषमा अंधारे यांनी अतिशय धडाकेबाज भाषण केलं. त्यांनी प्रबोधन यात्रा आपण का काढत आहोत? या यात्रेच नेमकं महत्त्व काय? ते सांगितलं. त्यांच्या भाषणावर शिवसैनिकांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या. सुषमा अंधेरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करत टीका केली. त्यांच्या मन की बात कार्यक्रमाचा उल्लेख करत निशाणा साधला. “जन की बात कब सुनोगे? आम्ही महाप्रबोधन यात्रा का करत आहोत? कारण प्रत्येक जण आपल्या मनातील सांगत आहे. जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही ही महाप्रबोधन यात्रा करत आहोत”, असं सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या. “जे लोक निघून गेले त्या लोकांनी फक्त पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला नाही. तर त्या लोकांनी जनतेचाही विश्वासघात केला. कारण तुम्ही शिक्के जे मारले होते त्या विचारधारा बघून मारले होते आणि नेमके त्या विचारधारेशीच या लोकांनी गद्दारी केली. मग हे विचारधारेच्या वेळेला हे लोक म्हणतात की अरे आम्ही कुठे विचारधारा सोडली? आम्ही बाळासाहेबांचेच विचारधारेचे आहोत. हे लोक बाळासाहेबांचे वारसधार कसे असतील? जे लोक हिंदुत्वाच्या नावाखाली इतर धर्मीयांचा द्वेष करतात त्यांना कळत नाही की धर्मवीर आनंद दिघे यांचे सर्वात विश्वासू साथीदार, सहकारी, मित्र, गुरुवर्य ते साबिरभाई शेख सारखे नेते होते. त्या साबिरभाई शेख यांना तुम्ही कसे विसरु शकता? जे लोक म्हणतात की, आम्ही बाळासाहेबांचे वारसदार, बाळासाहेबांचा वारसदार असणारा माणूस आपल्याच शिवसैनिक भावाच्या विधवा पत्नीच्या विरोधात कसा उमेदवार उभा करु शकतो? तोही दुसऱ्यांचा. एकीकडे शिवसेना वाचवायचं म्हणतात, आणि शिवसेनेचा उमेदवारच देत नाहीयत. पण तरीही यांना घाई फार असते”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. ( संकटकाळी राज ठाकरे मोठ्या भावाची साथ देणार? एका ट्विटने चर्चांना उधाण ) “कुठल्याही देशाची लोकसंख्या जास्त असणे ही समस्या अजिबात असू शकत नाही. प्रचंड लोकसंख्या ही देशाच्या विकासाच्या आड येत नाही. तर ती लोकसंख्या कोणत्याप्रकारची आहे त्यावर ते अवलंबून असतं. आपला देश हा तरुणांचा देश आहे. या तरुणाईला उद्योगधंदे आणि रोजगार देण्याची गरज होती. हे सरकार रोजगार देण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे तरुणांना फटका बसला. चुकीची अर्थव्यवस्था राबवल्यामुळे तरुणांचं नुकसान झालं. हे चुकीचं धोरण राबवणाऱ्यांचे बुरखे फाडले पाहिजेत म्हणून ही यात्रा आहे. कारण लोक शहाणे झाली पाहिजेत”, असं अंधारे म्हणाल्या. “नेता सच्चा असला पाहिजे तर त्याची पूर्वअट अशी आहे की जनता सुद्धा सच्ची असली पाहिजे. म्हणून सच्चा जनतेला सच्चा नेता मिळण्यासाठी आधी जनतेला सजग मतदार म्हणून प्रबोध झालं पाहिजे. मतदारांना कळलं पाहिजे की, आपण काय केलं पाहिजे. आपल्या उमेदवार निवडता आला पाहिजे. त्यासाठी ही महाप्रबोधन यात्रा गाव-खेड्यातून जाणार आहे. ही महाप्रबोधन यात्रा पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि दुसऱ्या टप्प्यात विधानसभा लेव्हला असेल. गाव-खेड्यांमध्ये जाऊन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचा माणूस म्हणून माणूस जोडण्याचं काम ही प्रबोधन यात्रा करेल”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








