जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सर्वात मोठी बातमी, सलग 9 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात

सर्वात मोठी बातमी, सलग 9 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात

मुंबईतील बलार्ड पिअर भागातील ईडी कार्यालयाजवळ मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. अतिशय जलद वेगाने घडामोडी घडत होत्या. त्यामुळे राऊतांना आता अटक होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर ईडीने त्यांना ताब्यात घेतलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 जुलै : मुंबईहून एक खूप मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊतांची आज सकाळपासून चौकशी सुरु होती. राऊतांविरोधात चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचे पथक आले होते, अशी देखील माहिती समोर आली होती. ईडी अधिकाऱ्यांची तीन पथकं संजय राऊतांविरोधात तपास करत होते. संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. जवळपास 1034 कोटींचा हा घोटाळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीने संजय राऊतांना याआधी दोनवेळा समन्स बजावले होते. पण राज्यसभेचं पावसाळी अधिवेशनाचं कारण देत संजय राऊतांनी चौकशीला जाणं टाळलं होतं. अखेर ईडी अधिकाऱ्यांनी आज सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास संजय राऊतांच्या घरावर छापा टाकला. संजय राऊतांची आणि त्यांच्या कुटुंबियांची जवळपास 9 तास चौकशी झाली. ईडी अधिकाऱ्यांनी राऊतांच्या भांडूप येथील घरापाठोपाठ त्यांच्या दादर येथील घरावरदेखील सकाळी छापा टाकला. तिथे देखील अधिकाऱ्यांकडून झडती घेण्यात आली. तसेच राऊतांशी संबंधित आणखी एका ठिकाणी छापा टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. संजय राऊत यांची सलग नऊ तास चौकशी केल्यानंतर हालचालींना वेग आला. त्यांच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. राऊतांच्या भांडूप आणि दादर या दोन्ही घरांच्या बाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर मुंबईतील बलार्ड पिअर भागातील ईडी कार्यालयाजवळ मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. अतिशय जलद वेगाने घडामोडी घडत होत्या. त्यामुळे राऊतांना आता अटक होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर ईडीने त्यांना ताब्यात घेतलं आहे. शिवसैनिक प्रचंड आक्रमक ईडी कारवाईमुळे शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांच्या भांडूप येथील ‘मैत्री’ या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांची प्रचंड मोठी गर्दी जमा झाली. मैत्री बंगल्याच्या दोन्ही गेटबाहेर शिवसैनिकांची आज सकाळपासून गर्दी जमलेली आहे. आम्ही राऊतांना घेवून जावू देणार नाही, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. शिवसैनिकांकडून प्रचंड घोषणाबाजी सुरु आहे. शिवसैनिकांचा आक्रमकपणा पाहता पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा मैत्री बंगल्याबाहेर तैनात करण्यात आला आहे. ( ‘ते तर म्हणाले होते मी काहीच केलेलं नाही, मग…’; राऊतांवरील ED च्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ) सकाळपासून नेमकं काय-काय घडलं? CRPF जवानांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये ईडीच्या अधिकारी आज सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी पोहोचले. घरी पोहोचल्यानंर राऊत परिवाराला घराच्या झडतीचे आदेश दाखवले. सकाळी 7 वाजून 55 मिनिटे - संजय राऊत यांनी इडीच्या अधिकाऱ्यांना झडतीची परवानगी दिली आणि सर्च वॅारंटवर सही केली. “खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र” सकाळी 8 वाजून 55 मिनिटे - संजय राऊत यांनी पुन्हा ट्वीट केले कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन. सकाळी ९ वाजून ९ मिनिटे - संजय राऊतांचे आणखी एक ट्वीट संजय राऊत यांनी पुन्हा ट्विट केले “शिवसेना झिंदाबाद!!! लढत राहीन..” सकाळी 8 वाजून 40 मिनिटे ते अजूनपर्यंत

ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या परिवारातील सदस्यांची चौकशी करत आहेत. या दरम्यान संजय राऊत आणि परीवारातील काही सदस्यांची समोरासमोर बसून चौकशी केली गेली. या दरम्यान संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांना पुर्ण सहकार्य केल्याचे बोलले जात आहे. शिवाय तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत असं देखील राऊत अधिकाऱ्यांना बोलले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात