शिर्डी, 22 नोव्हेंबर: शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( Shiv Sena Leader Abdul Sattar) यांनी रविवारी राजकीय भूकंप घडवून आणला. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांची भेट घेत त्यांनी शिवसेनेची ऑफर (Shiv Sena Offer) दिली. विखे पाटील यांना शिवसेनेत येण्याचं आवाहन केल्याचं अब्दुल सत्तार यांनी खुद्द सांगितलं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेत यावं. विखे पाटील राज्याचे अनुभवी नेतृत्त्व आहे. विखे पाटलांच्या नेतृत्त्वाची राज्याला गरज आहे, असं शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी श्रीरामपुरात सांगितलं.
हेही वाचा....राज्यात ‘कोरोना’ वाढला तर जबाबदारी घेणार का? मुख्यमंत्र्यांनी केली भाजपवर टीका
अब्दुल सत्तार आणि माझी मैत्री पक्ष विरहीत आहे. ही राजकीय भेट नसल्याचं विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, अब्दुल सत्तार यांनी मी त्यांच्यासाठी ऑफर घेऊन गेलो होतो, असं सांगितलं आहे.
महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार रविवारी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीला लोणी गावी गेले होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत सत्तार यांनी चर्चा केली. एवढंच नाही तर दोघांनी सोबत स्नेहभोजनचा आस्वादही घेतला. खरं तर विखे पाटील भाजपमध्ये जात असताना सोबत कोण जाणार? ही जोरदार चर्चा होत असताना अब्दुल सत्तार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, अब्दुल सत्तार शिवसेनेत गेले आणि विखे पाटील भाजपमध्ये. आज शिवसेना सत्तेत आहे तर भाजप विरोधात आहे. विखे पाटील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी शिवसेनेत यावं अशी ऑफर त्यांनी विखे पाटलांना दिली. या अगोदरही विखे पाटील शिवसेनेत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी याबद्दल मी बोलणार असून ते अंतिम निर्णय घेतील, असंही अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.
हेही वाचा...महाराष्ट्रात पदवीधर निवडणुकांनंतर सत्तापालट होणार, बड्या नेत्यानं केला दावाकाय म्हणले विखे पाटील?
अब्दुल सत्तार हे माझे चांगले मित्र असून पक्षविरहित आमची मैत्री आहे. आज पंचायत समितीच्या कार्यक्रमासाठी अब्दुल सत्तार यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणत असले तरी राजकारणात काहीही होवू शकतं. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असलेले विखे पाटील भाजपत आले. मात्र, आजही विरोधात राहण्याची वेळ आल्याने उद्या ते पुन्हा शिवसेनेत दिसले तर नवल वाटायला नको, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.