एक चूक झाली आणि अख्खं कुटुंब गमावलं, डोळ्यासमोरच मुलगा, मुलगी आणि पत्नी ठार

एक चूक झाली आणि अख्खं कुटुंब गमावलं, डोळ्यासमोरच मुलगा, मुलगी आणि पत्नी ठार

भरधाव वेगामुळे डोळ्यासमोर संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू पाहण्याची दुर्दैवी वेळ 35 वर्षीय चालकावर ओढावली आहे.

  • Share this:

हरिष दिमोटे, शिर्डी, 29 जानेवारी : एका चुकीमुळे कसं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं, हे दाखवणारी घटना शिर्डी परिसरातून समोर आली आहे. भरधाव वेगामुळे डोळ्यासमोर संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू पाहण्याची दुर्दैवी वेळ 35 वर्षीय चालकावर ओढावली आहे. चालकाचे नियंणत्र सुटल्याने झालेल्या अपघातात त्याचा मुलगा, मुलगी आणि पत्नी जागीच ठार झाली आहे.

कोपरगाव तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गाडीचा चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

धारणगाव ग्रामपंचायत हद्दीत सोनार वस्ती फाट्यानजीक मध्यरात्रीच्या सुमारास कळवण नाशिक येथील होंडा कार (क्रं.एम.एच.15 बी.एक्स.5145) कोळपेवाडीकडून कोपरगावकडे जात होती. कार भरधाव वेगात येत असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार लिंबाच्या झाडावर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.

हेही वाचापोलिसानेच उचलला कॉन्स्टेबलवर हात म्हणून मंगेश यांनी संपवलं आयुष्य, नातेवाईकांचा आरोप

अपघातात कार चालक रवींद्र अशोक वानले (वय-35) हे गंभीर जखमी झाले असून त्यांची पत्नी, मुलगा साई वानले,मुलगी जानू वानले (वय-4) हे तिघे उपचारा दरम्यान ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा चक्काचूर होऊन तिने पेट घेतला. यामध्ये कारचा काही भाग जळून खाक झाला आहे.

हेही वाचा आईची माया आटली, अडीच वर्षाच्या लेकराला पलंगात बंद करून प्रियकरासोबत पळाली आणि...

या अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून अपघातग्रस्तांचे काही नातेवाईक आज दुपारी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाले. या नातेवाईकांनी वानले कुटुंब कोठे जात होते याची माहिती नसल्याचे उघड झाले आहे. चालक हे काहीतरी तणावात असावे असा कयास व्यक्त होत आहे. मात्र ते मद्यधुंद मात्र नव्हते असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. याबाबत धारणगाव येथील पोलीस पाटील यांचे पती निळू तात्याबा रणशूर यांनी याबाबत चालकाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.

दरम्यान, रस्त्यावर अनेकदा वेगासंदर्भात सूचना लिहिलेल्या असतात. मात्र तरीही चालक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे रस्ते अपघातात गेल्या काही दिवसांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

First published: January 29, 2020, 6:14 PM IST

ताज्या बातम्या