हैदर शेख, प्रतिनिधीचंद्रपूर, 28 जानेवारी : राजुरा पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल आत्महत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. ठाणेदार कासार यांनी मारहाण केल्याने मंगेश जक्कुलवार यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
दोषी कासार यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी जक्कुलवार कुटुंबीय आणि नातेवाईकांनी राजुरा शहरात रास्ता रोको केला. रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर स्वतः पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालत तक्रार नोंदवून घेण्याचं आश्वासन दिलं.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपाई मंगेश जक्कुलवार यांचा प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय. मंगेश जक्कुलवार मूळ चंद्रपूर शहरातील रहिवासी असून ते राजुरा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अर्थात 26 जानेवारी रोजी रात्री उशिरा कर्तृव्यावर रुजू झाले होते. ड्युटी पूर्ण झाल्यानंतर मंगेश सकाळी परत घरी गेले. यानंतर काही वेळाने त्याचा मृतदेह राजुरा ते बल्लारपूर या शहरादरम्यानच्या रेल्वे उड्डाण पुलाखाली निर्जन शेतशिवारात आढळून आला होता.
मंगेश यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलीस दलातही खळबळ उडाली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन त्यांचा मृतदेह तपासणीसाठी ताब्यात घेतला. मंगेश यांनी अचानक इतक्या टोकाचा निर्णय का घेतला याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत.
मंगेश हे पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात कार्यरत होता. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण काय? त्याच्या अंगावरील कपड्यांमध्ये एखादी सुसाइड नोट सापडली का? याविषयी देखील पोलीस मौन बाळगून आहेत. दरम्यान, ही घटना आणि आत्महत्येमागचे कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.