मुंबई : शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. त्यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाला टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाविकास आघाडी तुटू शकते, असा इशारा संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला होता. यावर मस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी तूट शकते हे बोलण्यापेक्षा मविआ तोडाच. ते खरे शिवसैनिक असते तर त्यांनी आतापर्यंत महाविकास आघाडी तोडली असती असं मस्के यांनी म्हटलं आहे.
मस्के यांनी नेमकं काय म्हटलं?
नरेश मस्के यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी तुटू शकते हे फक्त बोलण्यापेक्षा मविआ तोडा. खरे शिवसैनिक असते तर आतापर्यंत महाविकास आघाडीतून बाहेर पडला असतात. राहुल गांधींविरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे होते, पुतळे जाळले पाहिजे होते. मणीशंकर अय्यर यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं तर त्यांच्या प्रतिमेला बाळासाहेब ठाकरे यांनी जोडे मारले होते. मात्र हे आता शांत बसले आहेत असं मस्के यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : लव्ह जिहादविरोधी कायद्याची गरज, ...त्यांना संरक्षण मिळायला हवं, चित्रा वाघ यांची मागणी
राऊतांच्या वक्तव्याशी सहमत
दरम्यान यावेळी मस्के यांनी संजय राऊत यांच्या दुसऱ्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. देशाच्या जडणघडणीत पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मोठा वाटा होता असं सजंय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना त्यांनी आपण संजय राऊत यांच्या वक्तव्याशी सहमत आहोत असं म्हटलं आहे. कोणत्याही नेत्याबाबत चुकीची वक्तव्य करणं योग्य नसल्याचही यावेळी मस्के यांनी म्हटलं.
हेही वाचा : 'त्याची किंमत मला मोजावी लागली', शरद पवारांनी 'त्या' आठवणींना दिला उजाळा
विचारेंना टोला
दरम्यान यावेळी मस्के यांनी राजन विचारे यांनाही खोचक टोला लगावला आहे. राजन विचारे हे भयभीत झाले आहेत. त्यांना साधा मच्छर जरी चावला तरी तो मुख्यमंत्र्यांनी पाठवला असं त्यांना वटतं असं मस्के यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shiv sena