राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा, 14 मे : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. हे राज्य बेकायदेशीर असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी सर्वजण करत आहे. राज्यातील सरकारने नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे, असं आदित्य ठाकरे यांनी विधान केलं होतं. या विधानाला बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते बुलढाणा येथे माध्यमांशी बोलत होते. काय म्हणाले आमदार संजय गायकवाड? आदित्य ठाकरे यांनी नैतिकतेच्या गप्पा करू नयेत. राज्यातील जनतेने शिवसेना भाजपला राज्यात निवडून दिलं होतं. मात्र, सत्तेच्या लालचेपायी तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जाऊन जनतेशी खरी गद्दारी केली आहे. येणाऱ्या निवडणुकांत आम्ही निवडून येऊच. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुमचे काय हाल करते हे तुम्हीच पाहा, असं म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. वाचा - कर्नाटक विजयावर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले; राहुल गांधींचं कौतुक, भाजपच्या डोळ्यात झणझणीत अंजन श्रीकांत शिंदे यांचाही आदित्य ठाकरेंवर बाण आगामी मुंबई महापालिका निवडणुकांआधीच शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जुंपलेली दिसत आहे. मुंबई महापालिकेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. नुकतीच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबई महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची माहिती राज्यापालांना दिली आहे. त्याच्या चौकशीची मागणी लोकायुक्तांकडून करण्यात यावी अशी मागणी आम्ही केल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी पलटवार केला होता. आदित्य ठाकरे यांचे आरोप काय होते? आदित्य ठाकरे यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ते राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबई महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची माहिती राज्यापालांना दिली आहे. त्याच्या चौकशीची मागणी लोकायुक्तांकडून करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. पाच कंत्राटदारांना 66 टक्के जादा दराने कामं देण्यात आली आहेत. रस्ते कामात सहा हजार कोटींचा घोटाळा आणि एकाच कंपनीकडून खडी खरेदी करण्याची सक्ती असे तीन मुद्दे आम्ही राज्यपालांकडे मांडल्याचं यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.